पोल्ट्रीधारकांच्या व्याजमाफीसाठी शिवसेना आग्रही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:24 IST2021-05-20T04:24:46+5:302021-05-20T04:24:46+5:30
(लोकमत कात्रण - १९०५२०२१-कोल-पोल्ट्री) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना, लॉकडाऊन, बर्ल्ड फ्लू यामुळे उद्ध्वस्त झालेल्या पोल्ट्रीधारकांच्या कर्जाला व्याजमाफी ...

पोल्ट्रीधारकांच्या व्याजमाफीसाठी शिवसेना आग्रही
(लोकमत कात्रण - १९०५२०२१-कोल-पोल्ट्री)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना, लॉकडाऊन, बर्ल्ड फ्लू यामुळे उद्ध्वस्त झालेल्या पोल्ट्रीधारकांच्या कर्जाला व्याजमाफी द्यावी, यासाठी आता शिवसेनाही आग्रही राहिली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांना बुधवारी निवेदन दिले.
एक मागून एक संकटे पोल्ट्रीधारकांच्या मागे लागली आहेत. गेली दोन वर्षे हा व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आला आहे. बँकांकडून लाखो रुपयांची कर्जे घेऊन पक्ष्यांचे संगोपन सुरू आहे. त्यात दुसऱ्या लाटेमुळे सगळे ठप्प आहे. मालाचा उठाव होईना, दरात मोठी घसरण झाल्याने बँकांचे हप्ते भरायचे कसे? असा पेच पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांसमोर आहे. यासाठी जिल्हा बँकेने त्यांच्याकडील कर्जदार पोल्ट्रीधारकांचे व्याज माफ करावे, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माने यांची भेट घेऊन ही मागणी लावून धरली. बँकेकडील कर्जदारांचे १ जून पूर्वीचे व्याज माफ करावे. त्याचबरोबर राज्यातील पोल्ट्रीधारकांनाही दिलासा देण्याची गरज असून, त्यांचेही राज्य सरकारने व्याजमाफीचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी विजय देवणे यांनी केली.
दरम्यान, पोल्ट्रीधारकांच्या व्याजमाफीबाबत जिल्हा बँकेच्या पातळीवर चाचपणी सुरू आहे. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय बँक जाहीर करण्याची शक्यता आहे.
फोटो ओळी : जिल्हा बँकेकडील पोल्ट्रीधारकांचे कर्जावरील व्याज माफ करावे, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी बुधवारी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्याकडे दिले. (फोटो- १९०५२०२१-कोल- केडीसीसी)