पदाधिकारी बदलामध्ये शिवसेना ताठर भूमिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:11 IST2021-01-24T04:11:02+5:302021-01-24T04:11:02+5:30
कोल्हापूर : जसजसे दिवस उलटतील तसतसा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलातील गुंता वाढत असल्याचे चित्र आहे. आगामी तीन महिन्यांत होणाऱ्या ...

पदाधिकारी बदलामध्ये शिवसेना ताठर भूमिकेत
कोल्हापूर : जसजसे दिवस उलटतील तसतसा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलातील गुंता वाढत असल्याचे चित्र आहे. आगामी तीन महिन्यांत होणाऱ्या जिल्हा बँक, गोकुळ तसेच अन्य निवडणुकांचे संदर्भही असल्यामुळे जोपर्यंत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्यात एकमत होत नाही, तोपर्यंत हा बदल होणार नाही. मात्र बदलत्या परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या माजी आमदारांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसाठीच ताठर भूमिका घेतल्याचे सांगण्यात येते.
सत्तांतरानंतर एक वर्ष झाल्यानंतर पदाधिकारी बदलाचे सर्वांनाच वेध लागले आहेत. मात्र पुढचा अध्यक्ष काँग्रेसचा करायचा की राष्ट्रवादीचा, याबाबत काही ठरले नसल्याचे सांगण्यात येते. मुश्रीफ आणि सतेज पाटील ठरवताना असं अर्धवट काही ठरवत नाहीत, असा आधीचा अनुभव आहे. परंतु त्या दोघांनी हे गुपित ठेवले आहे. त्यामुळे महापालिका पॅटर्न राबवल्यास आपला नंबर लागावा यासाठी राष्ट्रवादीतील इच्छुकांनीही प्रयत्न सुरू केले आहेत.
असे असले तरी, शिवसेनेच्या माजी आमदारांनी याप्रकरणी ताठर भूमिका घेतल्याचे सांगण्यात येेते. माजी आमदार सुजित मिणचेकर, उल्हास पाटील आणि सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते असलेले प्रवीण यादव, स्वाती सासने आणि हंबीरराव पाटील हे सध्या तीन शिवसेनेचे सभापती आहेत. सध्या आमच्याकडे कोणतेही पद नाही, तर किमान आमच्या कार्यकर्त्यांना तरी बदलू नका, अशी भूमिका या माजी आमदारांची आहे. आमदार प्रकाश आबिटकर जरी त्यांच्या गटासाठी इच्छुक असले, तरी त्यांच्याकडे सध्या आमदारकी आहे. चंदरदीप नरके यांचे कार्यकर्ते सर्जेराव पाटील यांनी पावणेतीन वर्षे पद भूषवले आहे, असाही युक्तिवाद केला जात आहे. हा विषय संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यापर्यंत मांडण्यात आला आहे. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी आता आमच्या मागे राहावे, अशी या तीनही पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.
स्वाभिमानीच्या डॉ. पद्माराणी पाटील या महिला बाल कल्याण सभापती आहेत. आवाडे यांची ताराराणी आघाडी आणि स्वाभिमानी सुरुवातीला एकत्र होती. परंतु स्वाभिमानीच्या शुभांगी शिंदे आणि ताराराणीच्या वंदना मगदूम यांनी आधी हे पद भूषवल्यामुळे आता आम्हाला बदलायचा प्रश्न येत नाही, असा दावा डॉ. पाटील करू शकतात.
चौकट
काँग्रेसमधील दावेदार
अध्यक्षपद हे इतर मागाससाठी राखीव असल्याने काँग्रेसमधून सरिता खोत, भगवान पाटील, पांडुरंग भांदिगरे यांची नावे आधीपासून चर्चेत होती. आता त्यामध्ये आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांची भर पडली आहे. खरोखरच इतर मागास असलेल्या सदस्याला संधी देऊन नेते धक्का देणार का, हा देखील औत्सुक्याचा विषय आहे. या ठिकाणी सतेज पाटील यांच्या भूमिकेला महत्त्व आहे.
राष्ट्रवादीमधील दावेदार
अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचे ठरले, तर मुश्रीफ यांचे सहकारी युवराज पाटील हे नंबर १ चे दावेदार आहेत. ज्येष्ठ सदस्य जयवंतराव शिंपी यांनीही दावा केला आहे. त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली आहे. शाहूवाडीचे विजय बोरगे हे देखील चर्चेत आहेत. मात्र या ठिकाणी मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.