शिवसेनेचा सर्वाधिक ५८ लाख, तर भाजपचा केवळ १० लाख खर्च

By Admin | Updated: November 27, 2015 01:05 IST2015-11-27T00:48:09+5:302015-11-27T01:05:17+5:30

महापालिका निवडणूक : सर्व राजकीय पक्षांनी सादर केले विवरण

Shiv Sena tops the list with 58 lakh, while BJP costs only 10 lakh | शिवसेनेचा सर्वाधिक ५८ लाख, तर भाजपचा केवळ १० लाख खर्च

शिवसेनेचा सर्वाधिक ५८ लाख, तर भाजपचा केवळ १० लाख खर्च


कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशेब जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे सादर केला आहे. या निवडणुकीत केवळ चार जागा जिंकणाऱ्या शिवसेनेने सर्वाधिक ५८ लाख रुपये खर्च केले असून राज्यात व केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्या भाजपने केवळ १० लाख रुपये खर्च केला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची आठवी सार्वत्रिक निवडणूक १ नोव्हेंबरला पार पडली. निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत सर्वच राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी हिशेब निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करायचे आहेत. त्यामुळे ही मुदत संपण्यात चार-पाच दिवस राहिले असताना सर्वच राजकीय पक्षांनी खर्चाचे हिशेब देऊन टाकले आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, ताराराणी आघाडी , शिवसेना या पाच प्रमुख पक्षांबरोबरच शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, राजू मानेप्रणित एस फोर ए आघाडी, हिंदू महासभा, भाकपने देखील या निवडणुकीत भाग घेतला होता. विशेष म्हणजे भाकप व हिंदू महासभा या दोन्ही पक्षांनी एकही रुपया खर्च केला नसल्याचे कळविले आहे.
राजकीय पक्षांना खर्चाची मर्यादा नव्हती, परंतु पक्ष जेवढा खर्च करेल तो त्या पक्षाच्या निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांच्या हिशेबात समान पद्धतीने समावेश करायचा होता. त्यामुळे काँग्रेसने ३४,०२७, राष्ट्रवादीने २९,६२०, शिवसेनेने ७१,६९३, भाजपने २७,४३५ तर ताराराणी आघाडीने ५१, १६८ रुपये इतका खर्च त्यांच्या प्रत्येक उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला. त्यामध्ये उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा समावेश करायचा आहे; एकूण खर्चाची मयादी तीन लाख रुपये इतकी आहे. उमेदवारांना वैयक्तिक खर्च सादर करण्याची अखेरची मुदत २ डिसेंबरपर्यंत देण्यात आली असून आतापर्यंत ९५ टक्के उमेदवारांनी क्षेत्रीय निवडणूक अधिकाऱ्यांकडे खर्चाचे हिशेब सादर केले असल्याचे सांगण्यात आले.

राजकीय पक्षांचा खर्च (रू.)
शिवसेना५८,०७,०७१
काँग्रेस२४,५६,१७०
राष्ट्रवादी २३,६९,५९२
ताराराणी २२,५१,३९१
भाजप १०,४२,५०७
एस फोर ए ३,७८,९१३
शेकाप ४४,८४६

Web Title: Shiv Sena tops the list with 58 lakh, while BJP costs only 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.