शिवसेनेत सुंदोपसुंदी संजय पवार : घरभेद्यांवर कारवाई करा
By Admin | Updated: May 18, 2014 00:54 IST2014-05-18T00:51:19+5:302014-05-18T00:54:01+5:30
कोल्हापूर : शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या निसटत्या पराभवानंतर शिवसेना नेत्यांत या पराभवास कारणीभूत कोण, यावरून सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.

शिवसेनेत सुंदोपसुंदी संजय पवार : घरभेद्यांवर कारवाई करा
कोल्हापूर : शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या निसटत्या पराभवानंतर शिवसेना नेत्यांत या पराभवास कारणीभूत कोण, यावरून सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी घरभेद्यांवर कारवाईची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. या निवेदनात पवार म्हणतात, मंडलिक यांचा पराभव निष्ठावंत शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला आहे. कोल्हापुरात शिवसेनेचा खासदार व्हावा, हे सेनाप्रमुखांचे स्वप्न होते. या निवडणुकीतही ते स्वप्न साकार होऊ शकले नाही, याची माझ्यासह अनेक शिवसैनिकांना खंत वाटते. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात गृहराज्यमंत्री सतेज पाटील व महाडिक गटांचे मनोमिलन झाले असतानाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केल्याने फक्त सात हजारांचेच मताधिक्य महाडिक यांना मिळू शकले. याउलट करवीर मतदारसंघात मात्र महाडिक यांना ३४ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातही मंडलिक यांना फारसे मताधिक्य मिळाले नाही. या दोन मतदारसंघांत शिवसेनेचा उमेदवार पिछाडीवर का राहिला, याच्या कारणांचा शोध घ्यावा, अशी विनंती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपर्कनेते दिवाकर रावते, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांना करणार आहे. शिवसेनेपेक्षा कुणी व्यक्तिकेंद्रित कामे केली व पक्षापेक्षा स्वत:चा स्वार्थ बघितला, अशा घरभेद्यांवर कारवाई करावी म्हणजे भविष्यात होणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशा घरभेद्यांना नक्की चाप बसेल.