शिवसेनेने एकदाच काय ते ठरवावे

By Admin | Updated: June 24, 2015 00:49 IST2015-06-23T23:40:56+5:302015-06-24T00:49:11+5:30

रावसाहेब दानवे : कोल्हापुरातील सेनेच्या निर्धार मेळाव्यातील टीकेचा निषेध

Shiv Sena should decide only once | शिवसेनेने एकदाच काय ते ठरवावे

शिवसेनेने एकदाच काय ते ठरवावे

कणकवली : संख्याबळावर कोणता पक्ष मोठा हे ठरते. त्यानुसार युतीमध्ये आमची आता मोठ्या भावाची भूमिका आहे. पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांकडून टीकात्मक वक्तव्ये करण्यापेक्षा शिवसेनेच्या नेतृत्वाने एकदाच आपली भूमिका जाहीर करावी. कोल्हापूर येथील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध करतो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्टपणे सांगितले. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युतीमध्ये भाजपची एकाधिकारशाही चालत असल्याच्या आरोपाचे दानवे यांनी खंडन केले. नेमक्या कोणत्या मुद्द्यावर अधिकार गाजवला तो शिवसेनेकडून सांगितल्यास आरोपाचे उत्तर दिले जाईल. दर आठवड्याला मुख्यमंत्र्यांसोबत युतीच्या मंत्र्यांची बैठक होत असते, असे दानवे म्हणाले. पक्षाने दिलेले लक्ष्य पूर्ण करून १ कोटी पाच लाख सदस्य संख्या गाठण्यात आली आहे. या सदस्यांना संपर्काचे महाभियान सुरू आहे. विधानसभा निवडणुकीतील निकालाने खचून न जाता कार्यकर्त्यांना ताकद देणे व भाजपची पाळेमुळे रूजविणे हा या संपर्क दौऱ्याचा उद्देश आहे. कोकण विकासाचा संकल्प पूर्ण केला जाईल.यावेळी प्रवक्ते माधव भांडारी, प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू, राजन तेली, बाळ माने, माजी आमदार प्रमोद जठार, मधुकर चव्हाण, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

सिंधुदुर्गात मंत्रिमंडळ बैठक
सिंधुदुर्गातील विविध प्रश्नांसाठी पुन्हा दौरा करण्यात येईल. आताच्या दौऱ्यात ज्या सूचना येतील त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहे. अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून मंत्रिमंडळाची बैठक सिंधुदुर्गात घेण्याचा आमचा मनोदय आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यटनाला चालना देण्यात येईल. याशिवाय पक्ष म्हणून प्रदेश कार्यकारिणीची बैठक कोकणात घेण्यात येईल.
पदवी परत करण्याचा प्रश्नच नाही
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावरील आरोपात तथ्य नाही. त्यांनी पदवीच्या आधारे कोणताही लाभ घेतलेला नाही. ते जे शिकले ते त्यांनी लिहिले. पदवी परत करण्याचा प्रश्न येत नाही. गरिबाची मुले पृथ्वीराज चव्हाणांसारखी विदेशात जाऊ शकत नाहीत. उपजीविकेसाठी मिळेल तिथे अ‍ॅडमिशन घेतात. जेव्हा सरकारसमोर हा प्रश्न येईल. तेव्हा पाहून घेऊ, असे दानवे यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena should decide only once

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.