शिवसेना सत्तेत आहे का ?

By Admin | Updated: June 24, 2015 00:45 IST2015-06-23T23:41:45+5:302015-06-24T00:45:33+5:30

राज यांचा टोला : जैतापूर वाद एकत्र बसून मिटविण्याची गरज

Shiv Sena is in power? | शिवसेना सत्तेत आहे का ?

शिवसेना सत्तेत आहे का ?

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन शंभर टक्के झाले आहे. प्रकल्पासाठी ८० टक्के निधीचे वितरण झाले आहे. आता या प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेना सत्तेत आहे काय? असा थेट प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत असल्यासारखे वागा. प्रकल्प व्हावा की नको हे शास्त्रज्ञ बघतील. आता विरोध करून काय फायदा? त्यापेक्षा सत्तेत आहात, तर एकत्र बसून वाद मिटवा, असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला.
गेल्या चार दिवसांपासून कोकण दौऱ्यावर असलेले राज ठाकरे मंगळवारी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जैतापूर प्रकल्पाबाबत आपली भूमिका याआधीच आपण स्पष्ट केली आहे. मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी भाभा अणुसंशोधन केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्याठिकाणी आवश्यक ते खबरदारीचे उपाय योजले गेले आहेत. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातही असे सुरक्षा उपाय योजले जाणारच आहेत. प्रकल्पाला विरोध हा भूसंपादनाआधी होणे समजण्यासारखे आहे. आता भूसंपादन पूर्ण झाले आहे. प्रकल्पाची बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता विरोध करून काय उपयोग आहे, असा प्रश्न त्यांनी केला.
कोकणात पर्यटनवृद्धीसाठी दोन-तीन अ‍ॅँकर प्रोजेक्ट होणे आवश्यक आहे. थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल्स् होण्याची गरज आहे. मतभेद विसरून उद्धव ठाकरे व आपण भाऊ पुन्हा एकत्र येणार काय, असे विचारल्यास राज यांनी हा नेहमीच विचारला जाणारा प्रश्न आहे, असे सांगत प्रश्नाला बगल दिली. (प्रतिनिधी)


संघटनात्मक बदल अटळ!
राज्यात विशेषत: कोकणात मनसेने जोर धरलेला नाही, याची गंभीर दखल घेऊन काही निर्णय घेणार काय, असे विचारले असता संघटना मजबूत करण्यासाठी योग्यवेळी निर्णय घ्यावेच लागतात. संघटनेचे बळ वाढण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय, संघटनात्मक काही बदल हे करावेच लागणार आहेत. त्याबाबत चर्चेतून निर्णय घेतला जाईल, असे राज ठाकरे म्हणाले.

Web Title: Shiv Sena is in power?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.