शिवसेना पदाधिकाऱ्यांचे उद्या राजीनामे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:12+5:302021-06-20T04:18:12+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या तीनही पदाधिकाऱ्यांचे सोमवारी राजीनामे होण्याची शक्यता आहे. संपर्कप्रमुख ...

शिवसेना पदाधिकाऱ्यांचे उद्या राजीनामे शक्य
कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या तीनही पदाधिकाऱ्यांचे सोमवारी राजीनामे होण्याची शक्यता आहे. संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर हे दुसऱ्यांदा यासाठी कोल्हापुरात येणार असून उद्या सोमवारी दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृहावर या विषयावर बैठक होणार आहे.
गेले दोन महिने शिवसेनच्या सभापतींच्या राजीनाम्यावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. दूधवडकर यांच्या पहिल्या बैठकीत तीनपैकी दोन सभापती अनुपस्थित होते. यानंतर संपर्क मंत्री उदय सामंत यांनीही जिल्हाप्रमुख आणि अन्य लोकप्रतिनिधींशी चर्चा केली होती. माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी सामंत यांच्याशी मुंबईत चर्चा झाल्याचे समजते.
त्यानंतरच अरुण दूधवडकर यांचा पुन्हा कोल्हापूर दौरा ठरला आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीसाठी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, सर्व माजी आमदार, आणि राजीनामे घ्यायचे आहेत असे तीन पदाधिकारी आणि शिवसेनेचे तीन जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार आहेत.
ज्याअर्थी दूधवडकर दुसऱ्यांदा कोल्हापुरात परत येत आहेत. त्याअर्थी कोणत्याही परिस्थितीत शिवसेना सभापतींचे राजीनामे निश्चित असून त्यानंतर लगेचच महिला बालकल्याण समिती सभापती, अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे राजीनामे ोघेण्याचे नियोजन आहे. त्यानंतरच जिल्हा परिषदेतील नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीला वेग येणार आहे.