शिवसेनेची घोषणाबाजी अन् निदर्शने
By Admin | Updated: September 4, 2015 00:56 IST2015-09-04T00:56:58+5:302015-09-04T00:56:58+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर : निवृत्त शासकीय अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी

शिवसेनेची घोषणाबाजी अन् निदर्शने
कोल्हापूर : शासनाच्या विविध खात्यांतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या संपूर्ण संपत्तीची व मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी करावी, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.शिवसैनिक दुपारी एकच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यानंतर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. शहरातील सहायक नगररचना कार्यालयसुद्धा यामध्ये मागे नाही. या कार्यालयातील बाबू लोकांच्या खासगीतील व मर्जीतील काही ठरावीक व्यक्ती की ज्यांचा या कार्यालयाशी काहीही संबंध नाही, त्यांची मात्र या कार्यालयांमध्ये रेलचेल असते. त्यांच्या आधाराने हे बाबू लोक काम करतात. सांकेतिक भाषा किंवा चिन्हातून हे ‘अर्थ’पूर्ण व्यवहार पूर्ण केले जातात. यामध्ये महापालिकेचे तत्कालीन सहायक संचालक (नगररचना) राठोड व महादेव फुलारी यांच्या कामांची व त्यांच्या मालमत्तेची ‘लाचलुचपत’ विभागाकडून चौकशी व्हावी.
कोल्हापूर महानगरपालिका, सहकार विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल खाते व उत्पादन शुल्क या विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तीन महिन्यांतून एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी. कोल्हापूर भ्रष्टाचारमुक्त होण्यासंदर्भात योग्य त्या सक्त सूचना द्याव्यात व त्याची अंमलबजावणी करावी. सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी आपली संपत्ती जाहीर करण्यासंदर्भात तातडीने आदेश द्यावेत. तसेच या आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे वेतन थांबवावे.
प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील कामांचा निपटारा करण्यासाठी वेळेची मर्यादा निश्चित करावी. त्याचबरोबर जिल्ह्यातील शासनाच्या विविध खात्यांतील वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या संपूर्ण संपत्तीची व मालमत्तेची चौकशी ‘लाचलुचपत’ विभागामार्फत होण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत. अशा निवृत्त अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून पर्दाफाश करावा. यामुळे जनतेला कळेल की, या सर्व अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मार्गाने मिळविलेल्या संपत्तीतून एखादे मोठे धरण बांधून पूर्ण होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनात दिलीप पाटील-कावणेकर, कमलाकर जगदाळे, बाजीराव पाटील, शशी बिडकर, हर्षल सुर्वे, राजू यादव, विराज पाटील, सुजित चव्हाण, रणजित आयरेकर, शुभांगी साळोखे, सुजाता सोहनी, अभिजित बुकशेठ, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
आरोप...
जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात भ्रष्टाचार बोकाळला आहे.
मर्जीतील खासगी व्यक्तीचा कार्यालयात वावर; त्यांच्या आधाराने सरकारी बाबूंचे कामकाज चालते.
सांकेतिक भाषा किंवा चिन्हाद्वारे चालतो ‘अर्थ’पूर्ण व्यवहार
सहायक नगररचना कार्यालयातही भ्रष्टाचार