‘मातोश्री’वरून शिवसेनेचे उमेदवार जाहीर होणार
By Admin | Updated: August 17, 2015 00:01 IST2015-08-17T00:01:10+5:302015-08-17T00:01:10+5:30
दुधवडकर : कार्यकर्त्याला पहिले प्राधान्य; अभियान पत्रकाचे प्रकाशन

‘मातोश्री’वरून शिवसेनेचे उमेदवार जाहीर होणार
कोल्हापूर : ‘शिवसेना माझी! मी शिवसेनेचा मतदार ’ या अभियानाद्वारे आमचे शिवसैनिक घरोघरी जाऊन मतदान करण्याविषयी व इतर समस्यांकरिता नागरिकांचे प्रबोधन करणार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनाही त्यांच्या निवडून येण्याच्या क्षमतेवर तिकीट दिले जाणार आहे. तिकीट देताना शिवसैनिकांना प्रथम प्राधान्य दिले जाणार असून उमेदवारांची अंतिम यादी ‘मातोश्री’वरूनच जाहीर होईल, अशी माहिती शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिली.
‘शिवसेना माझी, मी शिवसेनेचा मतदार’ या अभियान पत्रकाच्या प्रकाशनप्रसंगी ते रविवारी शिवसेना कोल्हापूर मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. दुधवडकर म्हणाले, आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावरच लढवू. जे पक्ष आणि संघटना आमच्याबरोबर येण्यास इच्छुक आहेत, त्यांनाही सोबत घेऊन आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेवर भगवा फडकवू.आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी, ताराराणी आघाडीने ग्रामीण भागातील लोकांची बोगस मतदार नोंद शहरात केली आहे. त्या मतदारांचाही शोध या मोहिमेद्वारे करू. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, आम्ही एकदिलाने काम करून ही महापालिका निवडणूक जिंकून दाखविणार आहे. यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे, सुजित चव्हाण, शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस, प्रा. विजय कुलकर्णी, विनायक साळोखे, किशोर घाटगे, नगरसेवक संभाजी जाधव, नगरसेवक राजू हुंबे, दत्ता टिपुगडे, अजित गायकवाड, शशिकांत बिडकर, कमलाकर जगदाळे, सुनील जाधव, आदी उपस्थित होते.
एकी केवळ कार्यक्रमापुरतीच ?
एकदिलाने काम करण्यासाठी आमदार गट व संजय पवार गट यांनी एकत्रित येऊन काम करावे, याकरिता वरिष्ठ नेत्यांची ‘समझोता एक्स्प्रेस’ नुकतीच येऊन गेली, तरीही रविवारच्या या कार्यक्रमासाठी आमदारांचे कार्यकर्ते मध्यवर्ती कार्यालयासमोर उभे होते, तर संजय पवार यांचे कार्यकर्ते महापालिकेसमोर उभे होते. संपर्कप्रमुख येण्याअगोदर पाच मिनिटांपूर्वी पवार गटही कार्यालयात दाखल झाला. त्यामुळे एकी केवळ कार्यक्रमापुरती होती की काय, असा सवाल सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नव्हता.