शिवसेना-भाजपचा पहिल्यांदाच प्रवेश
By Admin | Updated: July 16, 2015 01:03 IST2015-07-16T01:03:29+5:302015-07-16T01:03:29+5:30
बाजार समिती निवडणूक : नंदकुमार वळंजू यांचा करिष्मा कायम; १९ पैकी १५ जागांवर राष्ट्रवादी-जनसुराज्यची बाजी

शिवसेना-भाजपचा पहिल्यांदाच प्रवेश
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना व भाजपने पहिल्यांदाच प्रवेश केला. ग्रामपंचायत गटातील दोन, तर अडते-व्यापारी गटातील एक जागा जिंकत युतीने आपले खाते खोलले असून, अपक्ष नंदकुमार वळंजू यांना समितीवर आपला दबदबा कायम राखण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीला १९ पैकी १५ जागांवर समाधान मानावे लागले.
मंगळवारी (दि. १४) पावणेअकरा वाजता ग्रामपंचायत गटातील चार जागांच्या मतमोजणीस सुरुवात झाली. सर्वसाधारण गटात शिवसेना-भाजप आघाडीचे संजय जाधव यांनी पहिल्यापासून आघाडी कायम राखली. दुसऱ्या जागेसाठी राष्ट्रवादी आघाडीच्या संगीता पाटील व शहाजीराव वारके यांच्यात चुरस राहिली. अखेर संगीता पाटील यांनी बाजी मारली. अनुसूचित जाती गटात राष्ट्रवादी आघाडीचे अमित कांबळे यांनी एकतर्फी विजय संपादन केला. आर्थिक दुर्बल गटात मात्र जोरदार रस्सीखेच राहिली. राष्ट्रवादीचे विजय आबिटकर व शिवसेनेचे शशिकांत आडनाईक यांच्यात शेवटपर्यंत कडवी झुंज झाली. आडनाईक अवघ्या चार मतांनी विजयी झाल्याचे घोषित केले; पण त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हरकत घेत फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये आडनाईक यांचे मताधिक्य आणखी बारा मतांनी वाढले.
अडते-व्यापारी गटातील लढत सुरुवातीपासूनच रंगतदार होती. वैभव सावर्डेकर, अतुल शहा, नंदकुमार वळंजू, सदानंद कोरगावकर, नीलेश पटेल, जमीर बागवान, आदी दिग्गज रिंगणात असल्याने मोजणीदरम्यान विजयाचा लंबक फेरनिहाय इकडून तिकडे जात होता. तिन्ही उमेदवारांमधील मतांचा फरक फारच कमी असल्याने उमेदवारांसह समर्थकांची धाकधुक वाढत होती.
त्यांचा जल्लोष अल्पकाळाचा!
राष्ट्रवादी आघाडीचे विजय आबिटकर यांचा विजय झाल्याचे कार्यकर्त्यांनी जाहीर केल्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला; मात्र आडनाईक विजयी झाल्याने हा जल्लोष अल्पकाळाचा ठरला.
दोन माजी सभापती पराभूत
समितीचे माजी सभापती संभाजी आकाराम पाटील व बाबगोंडा पाटील यांच्यासह संचालक कृष्णात चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला. नंदकुमार वळंजू, परशुराम खुडे व उदय पाटील या माजी संचालकांना पुन्हा संधी मिळाली.
दिग्गजांचा पराभव
व्यापारी गटात वैभव सावर्डेकर, नीलेश पटेल, अतुल शहा, जमीर बागवान; तर ‘प्रक्रिया’मध्ये ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे व ग्रामपंचायत गटात दिनकरराव कांबळे यांना पराभव पत्करावा लागला.
सभापती खुडे की बाबा लाड?
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे परशुराम खुडे व माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा लाड यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. पहिल्या वर्षी जनसुराज्य पक्षालाच सभापतिपद मिळण्याची शक्यता असून, उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ संचालक सर्जेराव पाटील-गवशीकर यांची वर्णी लागू शकते.
बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-जनसुराज्य व सतेज पाटील गटाने १९ पैकी १५ जागा जिंकत पुन्हा वर्चस्व प्रस्तापित केले. मागील संचालक मंडळात १९ पैकी ६ जनसुराज्य, २ काँग्रेस, १ ‘शेकाप’, १ विक्रमसिंह घाटगे गट, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ संचालक होते. सत्तेच्या वाटणीत सुरुवातीची दोन वर्षे जनसुराज्यचे दत्तात्रय साळोखे यांना सभापती म्हणून संधी मिळाली. त्यानंतरच्या काळासाठी राष्ट्रवादीचे कृष्णराव पाटील, दिनकर कोतेकर, दत्तात्रय पाटील यांना संधी मिळाली. नवीन संचालक मंडळात जनसुराज्य पक्षाचे ५, सतेज पाटील गटाचे २, ‘शेकाप’ १, विक्रमसिंह घाटगे गट १, शिवसेना-भाजप ३, अपक्ष १ व राष्ट्रवादी ६, असे बलाबल आहे. जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदाच्या राजकारणामुळे बाजार समितीत जनसुराज्यला संधी दिली जाऊ शकते. तशा घडामोडी पॅनेल बांधणीच्या वेळीच झाल्याचे समजते. सभापतिपद जनसुराज्य पक्षाला मिळाले, तर परशुराम खुडे व बाबा लाड यांची नावे पुढे येऊ शकतात. उपसभापतिपद राष्ट्रवादीला मिळाले, तर त्यांच्याकडून सर्जेराव पाटील यांचे नाव आघाडीवर राहू शकते. निवडणुकीनंतर महिन्यात सभापती, उपसभापती पदांच्या निवडी घ्यावा लागणार आहेत. त्यामुळे आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही निवड प्रक्रिया होऊ शकते.
दादांना यश... कार्यकर्त्यांत उत्साह
जिल्हा बँकेत लढत देऊनही शिवसेना-भाजपला फारसे यश मिळाले नव्हते, परंतु बाजार समितीच्या निवडणुकीत युतीने काँग्रेसला मागे सारून जोरदार लढत दिली. सेवा संस्था व ग्रामपंचायतींवर दोन्ही काँग्रेसचे पारंपरिक वर्चस्व आहे. तरीही शिवसेनेला ग्रामपंचायत गटातून दोन जागा मिळाल्या. भाजपला सदानंद कोरगावकर यांच्या रूपाने एक जागा मिळाली. यामुळे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेच्या नेत्यांना बरोबर घेऊन केलेल्या व्यूहरचनेला काही प्रमाणात तरी यश आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांतही उत्साहाचे वातावरण आहे.
त्यांचा जल्लोष अल्पकाळाचा!
राष्ट्रवादी आघाडीचे विजय आबिटकर यांचा विजय झाल्याचे कार्यकर्त्यांनी जाहीर केल्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला; मात्र आडनाईक विजयी झाल्याने हा जल्लोष अल्पकाळाचा ठरला.
दोन माजी सभापती पराभूत
समितीचे माजी सभापती संभाजी आकाराम पाटील व बाबगोंडा पाटील यांच्यासह संचालक कृष्णात चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला. नंदकुमार वळंजू, परशुराम खुडे व उदय पाटील या माजी संचालकांना पुन्हा संधी मिळाली.
दिग्गजांचा पराभव
व्यापारी गटात वैभव सावर्डेकर, नीलेश पटेल, अतुल शहा, जमीर बागवान; तर ‘प्रक्रिया’मध्ये ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे व ग्रामपंचायत गटात दिनकरराव कांबळे यांना पराभव पत्करावा लागला.