जनसुराज्य पक्षाला सोबत घेण्यास शिवसैनिकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:22+5:302021-03-24T04:22:22+5:30
गोकुळ निवडणुकीचे राजकारण सरूड : गोकुळच्या निवडणुकीमध्ये विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाला सामील करून घेतल्याने ...

जनसुराज्य पक्षाला सोबत घेण्यास शिवसैनिकांचा विरोध
गोकुळ निवडणुकीचे राजकारण
सरूड :
गोकुळच्या निवडणुकीमध्ये विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाला सामील करून घेतल्याने शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील शिवसैनिक तसेच माजी आमदार सत्यजीत पाटील-सरूडकर यांना मानणाऱ्या ठरावधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व ठरावधारक प्रतिनिधींची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी जनसुराज्यविरोधात नाराजी उघड केली आहे.
शिवसेनेचे माजी आमदार सत्यजीत पाटील-सरूडकर यांनी गोकुळच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या हेतूने पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. तथापि या आघाडीमध्ये भाजपचा घटक पक्ष असलेला जनसुराज्य शक्ती हा पक्षही सामील झाल्याने शिवसैनिक व ठरावधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. यातून विरोधी आघाडीच्या भूमिकेविषयी शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तथापि शाहुवाडी तालुक्यामधील ७५ टक्के ठराव हे सत्यजीत पाटील-सरूडकर यांच्या विचाराचे असताना शाहुवाडी तालुक्यामध्ये विरोधी आघाडी इतरांना उमेदवारी देण्याचा विचार करीत असेल, तर माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी स्वत:ची फरफट करून घेऊ नये, असा मतप्रवाहही या बैठकीतून पुढे आला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला उघड मदत केलेल्यांना आघाडी उमेदवारी देत असेल तर त्यांना तीव्र विरोध करण्याची भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत घेतली आहे.
सदर आघाडीमध्ये सन्मानाचे स्थान मिळणार नसेल तर सत्यजीत पाटील यांनी शाहुवाडी तालुक्यातील जनतेचा व ठरावधारकांचा सन्मान राखून जनहिताचा निर्णय घ्यावा, तत्त्वाशी तडजोड करण्यापेक्षा प्रसंगी गोकुळच्या राजकारणापासून अलिप्त राहावे अशा भावनाही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
या बैठकीला शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, तालुका प्रमुख दत्ता पवार, पं. स. सभापती विजय खोत, उपसभापती दिलीप पाटील, सदस्य पांडुरंग पाटील, डॉ. स्नेहा जाधव, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भीमराव पाटील, जालिंदर पाटील-रेठरेकर, सुरेश पारळे, संदीप पाटील आदींसह ठरावधारक प्रतिनिधी उपस्थित होते.