शिरोळकरांना मिळणार मुबलक पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:22 IST2021-01-18T04:22:21+5:302021-01-18T04:22:21+5:30
संदीप बावचे : शिरोळ शिरोळ शहराला शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान ...

शिरोळकरांना मिळणार मुबलक पाणी
संदीप बावचे : शिरोळ
शिरोळ शहराला शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेअंतर्गत २५ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना वाढीव व बळकटीकरण करण्यात येणार आहे. योजनेच्या आराखड्याला तांत्रिक मंजुरी मिळावी, यासाठी हा प्रस्ताव प्राधिकरण विभागाकडे पाठविण्यात आला असून शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर योजनेला मूर्त स्वरुप येणार आहे. नळपाणी योजनेच्या विस्तारासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. शिरोळकरांना आणखी स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यादृष्टीने घालवाड येथील कृष्णा नदीवर अद्ययावत पाणी योजनेसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. इंटकपासून नवीन पाण्याची टाकी, अंतर्गत पाईपलाईन या प्रमुख सुविधा आहेत. शुध्दीकरण केंद्राजवळ वाढीव केंद्र उभारणे, खराब झालेली वितरण नलिका बदलणे, कल्लेश्वर मंदिरानजीक पाच लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला तांत्रिक मंजुरीसाठी पाठविला आहे. या मंजुरीनंतर हा प्रस्ताव शासनाकडे गेल्यानंतर निधी मंजुरीसाठी लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करावा लागणार आहे.
---------------------
-
चौकट - नव्या योजनेचा फायदा
येत्या २५ वर्षातील लोकसंख्या गृहित धरुन पाणीपुरवठा विस्तारीकरणाचा आराखडा तयार केला आहे. नव्या योजनेमुळे उपनगरांनाही पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. तर सध्या माणसी ४० लिटर प्रमाणे पाणी वितरित होते. त्याऐवजी माणसी १३५ लिटर गृहित धरुन ही योजना आहे. चौकट - भविष्यात नळांना मीटर नळ पाणीपुरवठा योजनेच्या बळकटीकरणानंतर शिरोळकरांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, जितका पाण्याचा वापर तितकाच पाणी कर, असे शासनाचे धोरण आहे. शिवाय अनावश्यक वाया जाणाºया पाण्याची बचत करण्यासाठी भविष्यात नळांना मीटर बसवावे लागणार आहेत. कोट - पालिकेच्या माध्यमातून नळ पाणी योजना सक्षमीकरणासाठी नियोजन केले आहे. शिरोळकरांना मुबलक पाणी देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.
- अमरसिंह पाटील, नगराध्यक्ष
फोटो - १७०१२०२१-जेएवाय-०४-अमरसिंह पाटील