शिरोलीत वीज बिलांची होळी
By Admin | Updated: December 19, 2014 00:11 IST2014-12-18T23:56:01+5:302014-12-19T00:11:16+5:30
वीज दरवाढ : भाजपतर्फे निषेध; कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन

शिरोलीत वीज बिलांची होळी
शिरोली : वीज वितरण कंपनीने ग्राहकांना सूचना किंवा माहिती न देता एकतर्फी अन्यायकारक सुमारे २४ टक्के वीज दरवाढ केल्याच्या निषेधार्थ शिरोली येथील शिवसेना-भाजपच्यावतीने वीज बिलांची होळी करण्यात आली. ही दरवाढ मागे घ्यावी, याबाबतचे निवेदन कनिष्ठ अभियंता महेश गावडे यांना दिले.
वीज महावितरण कंपनीने २३.८० टक्के इतकी भरमसाट वाढ वीजदरात केली आहे. ही वाढ ग्राहकांना न परवडणारी आहे. या दरवाढीबाबत कोणतीही पूर्वसूचना ग्राहकांना न देता मनमानी दरवाढ केली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणार आहे आणि लोकांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना-भाजपच्यावतीने देण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे महेश चव्हाण, अनिल खवरे, सुरेश यादव, दीपक यादव, भाजपचे सतीश पाटील, दिलीप कौंदाडे, किरण कौंदाडे, सतीश रेडेकर, नितीन चव्हाण, राजकुमार पाटील, प्रल्हाद खोत यांच्यासह युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)