शिरोळ पालिका सांडपाणी प्रकल्प राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:18+5:302021-01-13T05:01:18+5:30
शिरोळ : शहरातील सांडपाण्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प आराखडा तयार करणे, माजी सैनिकांना करात सूट देणे, दिव्यांगांचा ...

शिरोळ पालिका सांडपाणी प्रकल्प राबविणार
शिरोळ : शहरातील सांडपाण्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प आराखडा तयार करणे, माजी सैनिकांना करात सूट देणे, दिव्यांगांचा निधी वाटप करणे यासह पंधरा विषयांना पालिकेच्या ऑनलाइन सभेत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते.
सोमवारी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ऑनलाइन पद्धतीने सभेस सुरुवात झाली. शहरात ड्रेनेजचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे बंदिस्त गटारी बांधून सर्व सांडपाणी एकत्र करून त्यावर प्रक्रिया राबविणे, यासाठी आराखडा तयार करण्याचा निर्णय सभेत झाला. कल्लेश्वर तलावामध्ये येणाऱ्या सांडपाण्यावर हा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पालिकेने स्वच्छ अभियानात सहभाग घेतला आहे. त्यामुळे शहर ओडीएफ म्हणून घोषित करण्याबरोबरच वन स्टार शहर म्हणून घोषित करण्यासाठी नियोजन करण्याचा ठरावही करण्यात आला. माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यांना त्यांच्याकडील नगरपालिका मालमत्ता करात सूट देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय झाला. याशिवाय दिव्यांगांना ४ लाख ९० हजार रुपयांचा निधी वाटपाचाही ठराव मंजूर झाला. चर्चेत तातोबा पाटील, अरविंद माने यांनी भाग घेतला.
शहरात विविध विकास योजनांतून कामे निश्चित करणे, कचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी करणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना बळकटीकरण करणे, यासह पंधरा विषयांना मंजुरी मिळाली. यावेळी मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.