शिरोळ : येथे रखडलेल्या मध्यवर्ती शासकीय इमारतीसाठी शासनाकडून एक कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. निधीअभावी इमारतीचे काम बंद होते. यामुळे तालुक्याच्या वैभवात भर घालणाऱ्या शासकीय इमारतीला अच्छे दिन येणार केव्हा, अशी अवस्था बनली होती. आमदार उल्हास पाटील यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर झाला आहे. अजूनही दीड ते पावणे दोन कोटी रूपयांचा निधी शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. एकाच छताखाली शासकीय कार्यालयांचे कामकाज चालावे, या हेतूने शासनाच्या योजनेतून सुमारे साडे सहा कोटी रूपये खर्चाचे बजेट मध्यवर्ती शासकीय इमारत शिरोळसाठी मंजूर झाले होते. तत्कालीन आमदार स्व. डॉ. सा. रे. पाटील यांच्या प्रयत्नामुळे शासकीय इमारतीसाठी निधी मंजूर झाला होता. टप्प्याटप्प्याने निधी मिळाल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून मध्यवर्ती शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू होते. गेल्या चार महिन्यांपासून निधीच नसल्याने पुन्हा बांधकाम रखडले. तालुक्याच्या वैभवात भर घालणाऱ्या इमारतीच्या बांधकामासाठी नव्या सरकारकडून निधी मिळून, अच्छे दिन केव्हा येणार या मथळ्याखाली ‘लोकमत’ने लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. आमदार उल्हास पाटील यांच्या प्रयत्नामुळे सुमारे एक कोटी रूपयांचा निधी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे. यामुळे रखडलेल्या बांधकामाला पुन्हा गती मिळणार आहे. मात्र, सर्व सोयींनी युक्त इमारत पूर्ण होण्यासाठी आणखी दीड ते पावणे दोन कोटी रूपयांची गरज आहे. (प्रतिनिधी)
शिरोळ शासकीय इमारतीला अच्छे दिन !
By admin | Updated: April 8, 2015 23:55 IST