शिरोळला ‘गावठी’ जोरात

By Admin | Updated: July 3, 2015 00:54 IST2015-07-03T00:54:32+5:302015-07-03T00:54:32+5:30

कारवाईचा फार्सच : राजरोस विक्री, उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

Shirol 'gavathi' loud | शिरोळला ‘गावठी’ जोरात

शिरोळला ‘गावठी’ जोरात

जयसिंगपूर : मालवणी विषारी दारूकांडाच्या घटनेनंतर शिरोळ तालुक्यात गावठी दारू हातभट्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. मात्र, ही कारवाई निव्वळ फार्सच ठरत आहे. धाडी पडतात, दारूचे रसायन नष्ट केले जाते; मात्र संशयित आरोपी फरार होतात, असेच चित्र आहे. एकीकडे ही कारवाई होत असताना तालुक्यात अनेक धाबे, हॉटेलमध्ये विनापरवाना दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे. याकडे उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यात जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड ही तीन पोलीस ठाणी आहेत. इचलकरंजी विभागांतर्गत राज्य शासनाचा दारूबंदी व उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहे. एखाद्या घटनेनंतरच किंवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हातभट्टी आणि गावठी दारूला आळा घालण्यासाठी कारवाईची मोहीम उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलिसांकडून राबविली जाते. मुंबईच्या मालवणी विभागात विषारी दारूचे सेवन करून शंभरपेक्षा अधिक लोकांचा बळी गेला. त्यानंतर शासनाने कारवाईचे आदेश दिल्यानंतर संबंधित विभागाकडून शिरोळ तालुक्यात गावठी दारू हातभट्ट्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. दानोळी येथे तीन दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र, संशयित आरोपी कारवाईवेळी फरार झाले, अशीच कारवाई दिसून आली आहे. अशी दारू तयार करणाऱ्या संबंधितांवर आजपर्यंत ठोस कारवाईच न झाल्यामुळे व यामागे अर्थकारण लपल्यामुळे कारवाईनंतर पुन्हा हे दारूअड्डे जोमाने सुरू होतात, सध्याही असेच चित्र आहे. (प्रतिनिधी)

महिन्याकाठी अर्थकारण
गेल्या तीन-चार वर्षांत शिरोळ तालुक्यात परमिट रूम-बीअर बारच्या संख्येत वाढ झाली आहे. तालुक्यात सुमारे ११६ परमिट रूम-बीअर बार असून, या व्यवसायिकांवर जुजबी कर वसूल करण्यात येत आहे. महिन्याकाठी अर्थकारण होत असल्यामुळे नियंत्रण ठेवणाऱ्या संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राजरोस विक्री
शिरोळ तालुक्यात दानोळी, शिरोळ, दानवाड परिसरात हातभट्ट्या आणि गावठी दारूचे अड्डे आहेत. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून या भागात दारू बनविली जाते. प्रामुख्याने इचलकरंजी, सांगली भागात या ठिकाणाहून छुप्या मार्गाने ती विकली जाते. यामुळे उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलीस करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Shirol 'gavathi' loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.