‘आप्पां’ची शिट्टी, दक्षिणेत बंटींची सुट्टी-- विधानसभा निवडणूक

By Admin | Updated: October 20, 2014 00:42 IST2014-10-20T00:12:10+5:302014-10-20T00:42:11+5:30

अमल महाडिक जाएंट किलर : ८५२८ मताधिक्यांनी विजयी

Ship of Appa, Bunting Holiday in the south - Vidhan Sabha election | ‘आप्पां’ची शिट्टी, दक्षिणेत बंटींची सुट्टी-- विधानसभा निवडणूक

‘आप्पां’ची शिट्टी, दक्षिणेत बंटींची सुट्टी-- विधानसभा निवडणूक

विधानसभा निवडणूक
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भल्याभल्यांचे अंदाज धुळीला मिळवून भाजपच्या अमल महाडिक यांनी विजय मिळविला. शहरात टोलविरोधी आंदोलन पेटले असताना टोलची पावती फाडणाऱ्या माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची ‘पावती’ लोकांनी त्यांचा एकतर्फी पराभव करून फाडल्याची प्रतिक्रिया निकालानंतर व्यक्त झाली. महाडिक यांनी अवघ्या २२ दिवसांत हा विजय मिळविला. सतेज पाटील यांच्याबद्दल मतदारसंघात असलेली प्रचंड नाराजी, पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील नेत्यांशी घेतलेले वैर, ‘काँग्रेसचा हात नको’ ही शहरी मतदारांतील मानसिकता आणि मोदी लाटेचा प्रभाव या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सतेज पाटील यांचा दारुण पराभव झाला.

विश्वास पाटील/
संतोष मिठारी ल्ल कोल्हापूर
जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधलेल्या या मतदार संघात लक्षवेधी लढत होती. सतेज पाटील यांनी मतदारसंघात चांगली विकासकामे केली. त्यांचा जनसंपर्कही चांगला होता; परंतु राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे बदललेले वागणे लोकांना खटकले. त्यातून झालेली नाराजी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली.
अमल महाडिक यांचे व्यक्तिमत्त्व फारसे प्रभावी नाही. त्यांचे वडील आमदार महादेवराव महाडिक हे काँग्रेसचे. चुलतभाऊ धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार; त्यामुळे महाडिक यांच्या घरातच किती पदे देणार, असा प्रचार झाला. महाडिक यांच्या दलबदलू राजकारणाचा मुद्दाही चांगलाच चर्चेत होता. कोल्हापूरचे राजकारण पुन्हा महाडिकांच्या हातात द्यायला नको, असा प्रचार जोरात होऊनही लोकांनी तो मनावर घेतला नाही. अमल यांना पहिल्या फेरीपासून अखेरपर्यंत सतरा फेरीत मताधिक्य मिळाले. याचा अर्थ लोकांनी सतेज पाटील यांना पाडायचेच, हे पक्के ठरविले होते. काँग्रेसबद्दलची नाराजीही सतेज पाटील यांना भोवली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना सतेज पाटील यांनी मदत करूनही त्यांनी यावेळेला उलट भूमिका घेतली. त्याबद्दल लोकांत नाराजीचा सूर होता; परंतु तो मतयंत्रात उमटला नाही. त्यापेक्षा काँग्रेसला मतदान नको, ही भावना जास्त प्रबळ ठरली. शिवसेनेचे विजय देवणे हे किमान २५ हजारांपर्यंत मतदान घेतील व त्याचा लाभ आपल्याला होईल, असेही सतेज पाटील यांना वाटत होते; परंतु शिवसेनेच्या शंभरावर शाखा आपल्याकडे खेचण्यात त्यांना यश आले. शिवसैनिक भाजपकडे वळले. अन्य मतदारसंघांत शिवसेना विजयीपथावर असताना याच मतदारसंघात ती मागे पडली; कारण तिची रसद कमळाला मिळाली हेदेखील महत्त्वाचे ठरले.
महाडिक यांच्याकडे वादळात दिवा लावण्याची ताकद आहे. वारे कोणत्या दिशेला वाहते हे ते नेमकेपणाने ओळखतात. अनेकदा राजकीय जुगार खेळण्याचा त्यांचा स्वभाव आहे. अमल यांची निवडणूकही जुगारच होता. ते स्वत: या चित्रात कुठेच नव्हते. ते काही बोलले की, लोक चिडून महाडिक विरोधात काम करतात म्हणून निवडणुकीत ते एक वाक्यही बोलले नाहीत. पडद्याआड राहून त्यांनी सारेच करून दाखविले. उलट थेट पाईपलाईन, कळंबा तलावाचा विकास, उपनगरांचा नागरी विकास, गावोगावी केलेली विकासकामे, गट म्हणून मजबूत संघटन हे पाठीशी असतानाही सतेज पाटील यांना विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही. या पराभवाने त्यांनाही जनतेने जमिनीवर आणून ठेवले.

जनतेच्या विश्वासावर विजय : अमल महाडिक
आमदार म्हणून जरी निवडून आलो, तरी मी एक सर्वसामान्य नागरिक आहे. जनतेच्या विश्वासावर विजय संपादित केला आहे. जनतेच्या व्यथा सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. टोल, एल. बी. टी. मुक्तता आणि तीर्थक्षेत्र, खंडपीठ, आदी प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी माझे प्राधान्य राहील. कोल्हापूरच्या विकासासाठी विरोधकांनाही सोबत घेऊन काम करणार आहे. ज्या इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली, त्यांचा माझ्या विजयात महत्त्वाचा वाटा आहे.

लोकशाहीचा निर्णय मान्य
लोकशाहीचा निर्णय मला मान्य आहे. माझ्या मतदारसंघात ३०७ कोटींची विकासकामे केली; पण दुर्दैवाने लोकांपर्यंत ती पोहोचली नाहीत अथवा त्यांनी ती गृहीत धरली नाहीत. नवख्या उमेदवाराला नेतृत्व करण्याची संधी या मतदारसंघातील जनतेने दिली आहे. तरीही थेट पाईपलाईन, कळंबा तलाव सुशोभीकरण, आदी अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. - सतेज पाटील

कौल मान्य
कोल्हापूर दक्षिणच्या जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. पूर्वीप्रमाणेच यापुढेदेखील सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी माझा लढा, आंदोलने सुरूच राहणार आहेत. - विजय देवणे

Web Title: Ship of Appa, Bunting Holiday in the south - Vidhan Sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.