शिये ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा
By Admin | Updated: August 25, 2014 22:53 IST2014-08-25T22:38:48+5:302014-08-25T22:53:35+5:30
ग्रामस्थांचे आंदोलन : अनियमित पाणीपुरवठ्याचा निषेध

शिये ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा
कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून पिण्याचा पाणीपुरवठा वारंवार खंडित झाल्यामुळे हनुमाननगर येथील शेकडो त्रस्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ग्रामपंचायतीचा निषेध व्यक्त करीत घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशाराही मोर्चातील कार्यकर्त्यांनी दिला.
या महिला मोर्चासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी सरपंच व सदस्यांना ठणकावताना तुम्हाला पाणीपुरवठा सुरळीत करणे जमत नसेल तर आम्हाला श्रीरामनगर व हनुमाननगरसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत द्या, अशी मागणी केली. त्यानंतर सरपंच लक्ष्मी फडतारे, उपसरपंच प्रवीण चौगले यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित केला.
यावेळी जि. प.चे सदस्य बाजीराव पाटील, पांडुरंग पाटील, ग्रा.पं. सदस्य रणजित कदम, शिवाजी गाडवे, मनोहर सुतार उपस्थित होते. मोर्चामध्ये सागर शिंदे, उदय जाधव, सुभाष जाधव, राहुल कर्णे, ग्रा.पं. सदस्या नयना शिंदे, शकुंतला माने, मंगल जाधव, सुनीता गाडवे, अरुणा जाधव, अनिता निकम, सरस्वती गाडवे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा अनियमित
पाच-सहा महिन्यांपासून हनुमाननगर येथील पाणीपुरवठा अनेक कारणांनी खंडित झाल्यामुळे तेथील नागरिक हैराण झाले होते. ग्रामपंचायतीकडील पाणीपुरवठा योजनेमुळे येथील पूर्वीच्या खासगी पाणीपुरवठा व्यवस्था बंद पडल्यामुळे ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्यावर लोकांना अवलंबून राहावे लागत होते. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीचा दुर्लक्षामुळे पाण्यावाचून वंचित राहावे लागल्याच्या तीव्र भावना मोर्चातील महिलांनी व्यक्त केल्या.