जयंतरावांविरोधात शेट्टी, प्रतीक पाटील एकत्र
By Admin | Updated: July 12, 2015 00:40 IST2015-07-12T00:40:17+5:302015-07-12T00:40:17+5:30
अनोखी युती : कॉँग्रेससह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचेही सूर जुळले

जयंतरावांविरोधात शेट्टी, प्रतीक पाटील एकत्र
सांगली : जयंत पाटील यांच्याविरोधात खासदार राजू शेट्टी व माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी ताकद एकवटली आहे. दोन दिवसांपूर्वी सांगलीत दोन्ही नेत्यांची याबाबत चर्चा झाली होती. इस्लामपुरातील एका बेकायदेशीर बांधकामाचा भांडाफोड करण्यासाठी स्वाभिमानी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले.
सांगलीत गुरुवारी आंदोलनाच्या निमित्ताने आलेल्या प्रतीक पाटील यांची भेट खासदार राजू शेट्टी यांच्याशी झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात काही वेळ त्यांनी राजकीय रणनीतीविषयी चर्चा केली होती. जयंतरावांच्या साम्राज्यात एकत्रित येण्याचे संकेत त्यांनी या बैठकीतून दिले होते. इस्लामपुरातील बेकायदेशीर बांधकामाच्या प्रश्नात शेट्टी यांनी लक्ष घालावे, अशी विनंतीही प्रतीक पाटील यांनी केली होती. त्याप्रमाणे शेट्टी यांनी इस्लामपूर नगरपालिकेच्या एका बेकायदेशीर बांधकामाबाबत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इस्लामपूर शहराध्यक्ष अनिल करळे, महेश पवार, युवक कॉंग्रेसचे विजय पवार यांनी शनिवारी सांगलीच्या प्रतीक पाटील यांच्या कार्यालयात या बेकायदेशीर बांधकामाविरोधात पत्रकार परिषद घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रथमच कॉंग्रेसच्या कार्यालयात उपस्थिती लावल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
राजू शेट्टी आणि प्रतीक पाटील यांनीच त्यांना बेकायदेशीर बांधकामाबाबत हल्लाबोल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कॉंग्रेस व स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी आता कामाला लागले आहेत.
इस्लामपूर तसेच वाळवा तालुक्यात जयंतरावांच्या विरोधात कॉंग्रेस व स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी एकत्रच असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बाजार समितीच्या निवडणुकीतील युतीचाही त्यांनी दाखला दिला. त्यामुळे आता शेट्टी व प्रतीक पाटील यांच्या एकत्रिकरणाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.
प्रतीक पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीतही इस्लामपुरात ठाण मांडून जयंतरावांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना प्रतिसाद दिला होता. शेट्टी व प्रतीक पाटील या दोघांचेही जयंतरावांशी राजकीय शत्रुत्व असल्याने त्यांनी एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीवेळीही शेट्टी यांना काँग्रेसच्या लोकांनी मदत केली होती. त्यावेळी छुप्या पद्धतीने चाललेला हा युतीचा खेळ आता उघडपणे सुरू झाला आहे. खा. राजू शेट्टी आता काय भूमिका घेतात याकडे काँग्रेसबरोबरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागू राहिले आहे. (प्रतिनिधी)
शह-काटशह सुरू
जयंत पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी यांच्यावर टीका सुरू केली आहे. शुक्रवारी सांगलीत एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा शेट्टी यांनाच ‘टार्गेट’ केले. त्यामुळे शनिवारी लगेच स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेसच्या इस्लामपुरातील पदाधिकाऱ्यांनीही सांगलीत पत्रकार परिषद घेऊन जयंतरावांच्या नेतृत्वाखालील नगरपालिकेवर टीकास्त्र सोडले.