सेवेसाठी राहिली अन् आईचे पाच तोळे दागिने चोरून गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST2021-08-26T04:28:06+5:302021-08-26T04:28:06+5:30
कोल्हापूर : आजारी आईच्या सेवेसाठी राहिलेल्या लेकीनेच घरातील सुमारे पाच तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची तक्रार खुद्द आईनेच करवीर ...

सेवेसाठी राहिली अन् आईचे पाच तोळे दागिने चोरून गेली
कोल्हापूर : आजारी आईच्या सेवेसाठी राहिलेल्या लेकीनेच घरातील सुमारे पाच तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची तक्रार खुद्द आईनेच करवीर पोलीस ठाण्यात दिली. ही घटना पाचगाव (ता. करवीर) येथील जगतापनगरात घडली. आईच्या तक्रारीनुसार संशयित आरोपी सुजाता दगडू खडके (रा. आकुर्डे, ता. भुदरगड) या तिच्या विवाहित लेकीवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जगतापनगरात लक्ष्मी पोपट वाघे (वय ६२) या वृद्धा राहतात, त्या आजारी असल्याने जानेवारी २०२१ मध्ये त्यांची विवाहित मुलगी सुजाता खडके (रा. आकुर्डे, ता. भुदरगड) त्यांच्या सेवेसाठी घरी राहिल्या होत्या. आईने विश्वासाने मुलीच्या ताब्यात घरातील कारभार दिला. तसेच सोन्याचे दागिने असलेल्या तिजोरीच्या चाव्याही दिल्या होत्या. काही दिवसांनी उपचारासाठी पैशाची गरज लागल्याने आईने लेकीकडे तिजोरीतील दागिने देण्याची मागणी केली. त्यावेळी तिने दागिने देण्यास टाळाटाळ केली, तसेच आईशी वादावादी, शिवीगाळ करून ती आकुर्डे येथे सासरी निघून गेली. त्यानंतर आईने लेकीला फोन करून वारंवार दागिन्यांची मागणी केली, पण त्यावेळी लेकीने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर असाह्य झालेल्या आईने आपल्या लेकीविरोधात अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र, दीड तोळे वजनाचे कानातील टॉप्स व वेल, एक तोळे वजनाच्या बांगड्या असे सुमारे सव्वादोन लाखांचे दागिने चोरल्याची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात नोंदवली, त्यानुसार सुजाता खडके हिच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.