वाढदिवशीच तिला मृत्यूने कवटाळले !
By Admin | Updated: May 3, 2014 17:02 IST2014-05-03T13:23:36+5:302014-05-03T17:02:45+5:30
ती गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाचा शेवटचा पेपर देऊन दुचाकीवरून मैत्रिणीसमवेत घरी निघाली होती आणि त्यात तिचा आज (शुक्रवार) वाढदिवस... तिच्या चेहर्यावर आनंद व हास्याचे फवारे होते... तिची दुचाकी गाडी शिवाजी विद्यापीठ रस्त्यावरून थेट टाकाळ्याकडे येत होती... कडक ऊन अन् वेळ दुपारी एक वाजण्याची... याच सुमारास अनुकामाणिका मंदिराजवळ पाठीमागून भरधाव येणार्या डंपरची तिच्या दुचाकीला जोराची धडक बसली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

वाढदिवशीच तिला मृत्यूने कवटाळले !
कोल्हापूर : ती गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाचा शेवटचा पेपर देऊन दुचाकीवरून मैत्रिणीसमवेत घरी निघाली होती आणि त्यात तिचा आज (शुक्रवार) वाढदिवस... तिच्या चेहर्यावर आनंद व हास्याचे फवारे होते... तिची दुचाकी गाडी शिवाजी विद्यापीठ रस्त्यावरून थेट टाकाळ्याकडे येत होती... कडक ऊन अन् वेळ दुपारी एक वाजण्याची... याच सुमारास अनुकामाणिका मंदिराजवळ पाठीमागून भरधाव येणार्या डंपरची तिच्या दुचाकीला जोराची धडक बसली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
काजल राजेंद्र पाटील (वय १८, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) असे तिचे नाव. तिच्या मृत्यूची वार्ता कळताच सीपीआर रुग्णालयाच्या आवारात तिच्या आईवडिलांनी हंबरडा फोडला. दरम्यान, या अपघातप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित डंपरचालक बाहुबली जिन्नाप्पा शेट्याबोळ (३५, रा. मणेर मळा, गणेश कॉलनी, उचगाव, ता. करवीर) याला अटक केली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, काजल पाटील व तिची मैत्रीण (नाव समजू शकले नाही) दुचाकीवरून शिवाजी विद्यापीठाकडून टाकाळ्याकडे येत होत्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव येणार्या डंपरने काजलच्या गाडीला जोराची धडक दिली. यात ती रस्त्यावर पडून डंपरखाली सापडली. यात तिचा जागिच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक तेथून पसार झाला. हा अपघात समजताच संतप्त नागरिकांनी डंपरवर दगडफेक करून संताप व्यक्त केला. अपघाताची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून काजलची गाडी व डंपर पोलीस ठाण्यास आणला. यानंतर हा प्रकार तिच्या घरच्यांना कळविला. दुपारी तिची आई, वडील, विवाहित बहीण व सानेगुरुजी वसाहत परिसरातील नागरिक सीपीआर रुग्णालयात आले. त्या ठिकाणी तिच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला.
डंपरवर दगडफेक...
घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. त्यामुळे संतप्त जमावाने अपघातानंतर डंपरवर जोरदार दगडफेक केली. यावेळी पोलीस येताच जमाव शांत झाला.
वाढदिवसाचा बेत!
मृत काजलचे वडील सत्यशोधक सहकारी बँकेत वसुली अधिकारी म्हणून काम करतात. ते मूळ नंदगाव (ता. करवीर) येथील आहेत. त्यांना पत्नी, दोन मुली आहेत. त्यांच्या पहिल्या मुलगीचा विवाह झाला आहे. त्यामुळे सानेगुरुजी वसाहत परिसरातील घरामध्ये तिघेजण राहात होते. आज (शुक्रवार) वाढदिवस अन् परीक्षेचा शेवटचा पेपर होता. तिचा सायंकाळी वाढदिवस करण्याचा बेत तिच्या कुटुंबीयांनी आखला होता. मात्र, वाढदिवस होण्याअगोदरच तिच्यावर काळाने झडप घातली.