तिने भावासह अनाथांनाही केले आपलेस
By Admin | Updated: August 11, 2014 00:44 IST2014-08-11T00:43:01+5:302014-08-11T00:44:09+5:30
अतूट बंधन : सासरहून ती आली भावाला भेटण्यासाठी बालकल्याण संकुलाते

तिने भावासह अनाथांनाही केले आपलेस
कोल्हापूर : व्यसनाधीन बापामुळे जन्मापासूनच नशिबी लागलेली गरिबी असल्याने एका लेकराची बालकल्याण संकुलात रवानगी, तर लेकीचे लग्न केले. अशा परिस्थितीमुळे बहीण-भावांची ताटातूट झाली. यावर हतबल न होता रूपाली आणि अजिंक्य यांनी बहीण-भावाच्या नात्याचा बंध कायम ठेवला आहे. त्यासह त्यांनी जन्मापासून आपले आई-वडील पाहिले नसलेल्यांनाही या नात्याद्वारे आपलेसे केले.
हुपरी (ता. हातकणंगले) येथील कल्पना व विलास या दांम्पत्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली. काही वर्षे त्यांचा सुखाचा संसार चालला. मात्र, अचानक विलास यांना दारूचे व्यसन लागले. त्यातच ते बेपत्ता झाले. ते बेपत्ता होऊन दहा वर्षे झाली. पती बेपत्ता असलेल्या आई कल्पना यांना उदरनिर्वाह चालविणे कठीण झाल्याने त्यांनी अजिंक्यला बाल संकुलात दाखल केले. चांगले स्थळ आल्याने मुलगी रूपालीचा विवाह करून दिला. उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने कल्पना हुपरी येथेच मिळेल ते काम करतात. गेल्या तीन वर्षांपासून अजिंक्य बाल संकुल येथे आहे. आज, रविवारी सकाळपासून सर्व सवंगड्यांबरोबर संस्थेत आलेल्या शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून अजिंक्यने राख्या बांधून घेतल्या. मात्र, त्याला सकाळपासून रूपाली दीदीची प्रतीक्षा लागून राहिली होती. दुपारी बारा वाजता रूपाली आली. तिने आपल्या भावासह इतर सवंगड्यांनाही राखी बांधली. ती फक्त आपल्या भावासाठी या ठिकाणी येत नाही, तर तिच्या भावासारखे अनेक अनाथ आहेत, त्यांच्यासाठी दरवर्षी न चुकता रक्षाबंंधनासाठी ती बालसंकुलात येते. तिच्या भावाबरोबर तिच्या राखीची वाट अनेक मुलेही पाहतात. रूपालीच्या माध्यमातून अनाथांनाही खरोखरचीच बहीण ओवाळण्यासाठी आल्यासारखे वाटते. (यातील नावे काल्पनिक घेतली आहेत.)