पोलीस अधिकाऱ्याबाबतची ‘ती’ न्यायालयीन पोस्ट फेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST2020-12-31T04:25:34+5:302020-12-31T04:25:34+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील एका पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावरील कारवाईबाबत न्यायालयाने शासनालाच मोठ्या रकमेचा दंड ठोठावल्याच्या आदेशाची पोस्ट सोशल मीडियावर ...

‘She’ court post about a police officer is fake | पोलीस अधिकाऱ्याबाबतची ‘ती’ न्यायालयीन पोस्ट फेक

पोलीस अधिकाऱ्याबाबतची ‘ती’ न्यायालयीन पोस्ट फेक

कोल्हापूर : जिल्ह्यातील एका पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावरील कारवाईबाबत न्यायालयाने शासनालाच मोठ्या रकमेचा दंड ठोठावल्याच्या आदेशाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पण त्याबाबत सत्यता पडताळणी केली असता, त्या तारखेला संबंधित न्यायालयातून कोणताही तशा पध्दतीचा निर्णय झाला नसल्याने हे पोस्ट फेक असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्याबाबत खातरजमा करण्याचे काम पोलीस पातळीवर सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील एका पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याबाबत गेल्या चार दिवसांत न्यायालयीन निकालाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये संबंधित अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईमुळे शासनालाच लाखो रुपयांचा दंड ठोठावल्याचे म्हटले आहे. या पोस्टमुळे पोलीस खात्यात खळबळ माजली आहे. त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याबाबत सत्यता पडताळली केली असता अशाप्रकारचा कोणताही आदेश संबंधित न्यायालयाने दिलेला नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ही पोस्ट फेक आहे. या पोस्टबाबत खातरजमा करण्याचे काम पोलीस यंत्रणेकडून यूध्दपातळीवर सुरु झाले आहे.

पण ही पोस्ट कोणी सोशल मीडियावर व्हायरल केली, ती कोणी तयार केली, त्याबाबत सायबर क्राईम विभागामार्फत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्याबाबत ठोस पुरावे हाती आल्यानंतर ही फेक पोस्ट व्हायरल करणाऱ्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

Web Title: ‘She’ court post about a police officer is fake