सराफांचा पुन्हा दोन दिवस बंद
By Admin | Updated: March 22, 2016 00:49 IST2016-03-22T00:42:16+5:302016-03-22T00:49:36+5:30
उद्या पुन्हा बैठक : जिल्हा सराफ संघाच्या बैठकीत एकमताने निर्णय

सराफांचा पुन्हा दोन दिवस बंद
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सराफ संघातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात आणखी दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
सराफ व्यवसायाला लागू केलेल्या अबकारी कराला विरोध करण्यासाठी देशाबरोबर जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून दुकाने बंद आहेत. त्याचबरोबर विविध मार्गांनी आंदोलने करून केंद्र सरकारचा निषेध केला जात आहे. त्याअंतर्गत शनिवारी रात्री बंद मागे घेतल्याचा चुकीचा संदेश मिळाल्याने रविवारी सराफ व्यावसायिकांत द्विधा मनस्थिती होती. त्यातच काही व्यावसायिकांनी दुकाने सुरू केली होती. ती काही वेळानंतर बंद केली. त्यामुळे आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सोमवारी बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष भरत ओसवाल यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी देशभर आंदोलनाच्या माध्यमातून कशाप्रकारे केंद्र सरकारचा निषेध केला जात आहे, त्यासंबंधी सविस्तर विवेचन केले. त्याचबरोबर शनिवारी दिल्लीत झालेल्या बैठकीतील वृत्तांतही दिला आणि त्यावेळी कशाप्रकारे चुकीचा संदेश दिला गेला आणि गोंधळ उडाला याचीही माहिती दिली. बुधवारी सकाळी पुन्हा बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्याचे ठरले. यावेळी कुलदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. माणिक जैन, बाबा महाडिक, राजेश राठोड, किरण गांधी, सुहास जाधव, संपत पाटील, रूपचंद ओसवाल, धर्मपाल जिरगे, सुरेश ओसवाल, महेंद्र ओसवाल यांच्यासह सभासद उपस्थित होते.
दोन दिवस बंद ठेवण्याला कर्नाटकातूनही पाठिंबा
जिल्ह्याबरोबर कर्नाटकातूनही आणखी दोन दिवस व्यवसाय बंद ठेवण्याला पाठिंबा दिला. निपाणी, चिकोडी, संकेश्वर, गोकाक, रायबाग येथील संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे सुरेश शेट्टी, अण्णासाहेब जडी, शशिकांत चडचाळे, रवींद्र शेट्टी, प्रकाश शहा, अनिल कोगनोळीकर आणि अक्षय पुरवंत यांनी बंदला पाठिंबा दिल्याची माहिती सुरेश गायकवाड आणि भरत ओसवाल यांनी दिली.