शेतात घाम गाळत अक्षताताई एमबीबीएस
By Admin | Updated: March 8, 2017 00:12 IST2017-03-08T00:12:01+5:302017-03-08T00:12:01+5:30
परिस्थितीनं शहाणपणं दिलं आणि शिकण्यावाचून पर्याय नाही हे कळलं.

शेतात घाम गाळत अक्षताताई एमबीबीएस
वीरकुमार पाटील -- कोल्हापूर शिक्षणासाठी हातात खोरं, खुरपं घेऊन शेतात राबणाऱ्या जिद्दी अक्षता गंभीर चौगुले हिने नुकतीच ‘एमबीबीएस’ची पदवी घेतली असून ‘एमडी’ होण्यासाठी तिचा अभ्यास सुरू आहे.
इचलकरंजी शहराजवळील माणकापूर (ता. चिक्कोडी) या सीमाभागातील जन्मगावात तिने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. आई म्हणजे काय? हे समजण्याच्या वयातच जन्मदात्रीनं तिचा हात सोडला आणि वडिलांबरोबच आजी, चुलते, चुलती यांनी तिचं संगोपन केलं. पाठीवर एक भाऊ. परिस्थितीच्या चटक्यामुळं शहाणपण आलेल्या अक्षतानं सातवीतच हातात खुरपं घेतलं. घरच्या शेतात झेंडू, भाजीपाला पिकवून तो रस्त्याकडेला बसून तिने विकला. व ते ही शाळा व रोजचा अभ्यास सांभाळून. दहावीत अक्षताला ८९ टक्के गुण मिळाले. त्यानंतर इचलकरंजीतील एएससी महाविद्यालयात तिने सायन्सला प्रवेश घेतला. कॉलेजची वेळ, अभ्यास सांभाळत तिनं शेतातली कामं सुरूच ठेवली. बारावीला ती ८३ टक्क्यांने पास झाली. बारावीनंतर मेडिकलला जायची ऐपत नव्हती; पण लातूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला. ज्या दिवशी परीक्षा होती त्याच्या दोन दिवस अगोदर वडिलांचं निधन झालं. दु:ख बाजूला सारलं आणि परीक्षा दिली. ७१ टक्केगुण मिळाले. अक्षता सध्या मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करीत आहे.
परिस्थितीनं शहाणपणं दिलं आणि शिकण्यावाचून पर्याय नाही हे कळलं. एमबीबीएसमुळं थोडा पैसा मिळणार असल्याने माझ्यासह भावाचं पुढचं शिक्षण पूर्ण करणार आहे. येणाऱ्या अडचणींवर मात करायचीच हे ठरविलं तर जगात अशक्य असं काहीच नाही, असं मला वाटतं.- अक्षता चौगुले.