शांतीसागर महाराज हेच शाहूंच्या समतेच्या विचाराचे वारसदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST2020-12-09T04:20:07+5:302020-12-09T04:20:07+5:30
कोल्हापूर : शाहू महाराजांनी घालून दिलेल्या समतेच्या विचाराच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या कार्यामुळे प्रथमाचार्य शांतीसागर महाराज हेच खऱ्या अर्थाने शाहूंचे वारसदार ...

शांतीसागर महाराज हेच शाहूंच्या समतेच्या विचाराचे वारसदार
कोल्हापूर : शाहू महाराजांनी घालून दिलेल्या समतेच्या विचाराच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या कार्यामुळे प्रथमाचार्य शांतीसागर महाराज हेच खऱ्या अर्थाने शाहूंचे वारसदार ठरतात, असे कौतुकाेद्गार आमदार प्रकाश आवाडे यांनी मंगळवारी काढले. महावीर अध्यासन केंद्र जैन संस्कृती, साहित्य, विज्ञानाचे बौद्धिक आंतरक्रियेसाठी जागतिक पातळीवरचे केंद्र बनेल, असा आशावादही व्यक्त केला.
दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या महावीर अध्यासन केंद्रातर्फे आयोजित मानवतेचे दीपस्तंभ शांतीसागर महाराज या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. शांतीसागर महाराजांच्या मुनिदीक्षा शताब्दीनिमित्त हे चर्चासत्र भरवले असून, याला महाराष्ट्र, कर्नाटकातून प्रतिनिधींनी सहभाग दर्शवला. यावेळी प्रा. डी. ए. पाटील लिखीत शांतीसागर महाराज जीवनचरित्र, भारती उपाध्ये लिखित आत्मसंस्कार या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
आवाडे म्हणाले, शांतीसागर महाराजांनी शाहू महाराजांच्या समतेचा विचार समाजात रुजविण्यासाठी ३० हजार किलोमीटरच्या पायी प्रवास केला. त्यांनी कायमच प्रगतशील विचारांना उचलून धरले. समाजाच्या उन्नतीसाठी होणाऱ्या उपक्रमांना त्यांनी सढळ हस्ते मदतीचे आवाहन केले. शांतीसागर महाराजांचे कार्य कायमच अनुकरणीय राहिलेे. त्यांचा हा जीवनपट समाजासमोर येण्यासाठी केलेले हा राष्ट्रीय चर्चासत्राचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही आवाडे यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी या चर्चासत्रात अभ्यास व संशोधनावर झालेली चर्चा उत्साह वाढवणारी असून महावीर अध्यासन केंद्र संशोधनात मोठी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला. समाजात मूल्यशिक्षणाची आवश्यकता असल्याने या अध्यासनातर्फे दर महिन्याला मूल्यशिक्षणावर आधारित व्याख्यान आयोजित करून त्याचा प्रसार समाजमाध्यमाद्वारे करावा, अशी सूचनाही शिर्के यांनी केली.
या चर्चासत्रात सुरेंद्र जैन, हेमंत लठ्ठे, संजय शेटे,सुरेश रोटे, डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. बी. डी. खणे, डॉ. पद्मजा पाटील, विमल पाटील, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, डॉ. रावसाहेब पाटील सहभागी झाले. संदीप पाटील यांच्या मंगलाचरणाने चर्चासत्राची सुरुवात झाली. प्रास्ताविक महावीर अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. विजय ककडे यांनी केले. सूत्रसंचालन एस. डी. पाटील यांनी केले. आभार सुरेश रोटे यांनी मानले.
चौकट ०१
आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते लठ्ठे फौंडशनचे उद्घाटन झाले. आवाडे यांनी लठ्ठे यांच्या जीवनावर पीएच.डी. करण्यासाठी अभ्यास शिष्यवृत्ती म्हणून पहिल्या दोन अभ्यासकांना प्रत्येकी ५१ हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली. याशिवाय लठ्ठे फौंडेशनतर्फे महावीर अध्यासन केेंद्राला संशोधन शिष्यवृत्तीसाठी एक लाखाची देणगीही देण्यात आली.
चौकट ०२
आज समारोप
शांतीसागर महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यासाठी घेतलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप आज, बुधवारी खासदार संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.