'शांताबाई’, ‘चोरीचा मामला'वर थिरकल्या सखी
By Admin | Updated: February 29, 2016 00:53 IST2016-02-29T00:43:42+5:302016-02-29T00:53:55+5:30
टाळ्या, शिट्ट्यांची बरसात : लावणीसम्राज्ञी अर्चना सावंत, पूनम कुडाळकर यांनी डोलवले

'शांताबाई’, ‘चोरीचा मामला'वर थिरकल्या सखी
कोल्हापूर : ‘शांताबाईचा नखरा, चोरीचा मामला आणि ‘ग साजणी, आली ठुमकत’ अशा गीतांना टाळ्या, शिट्ट्यांची होणारी बरसात, वन्समोअर अन् लावणीसम्राज्ञी अर्चना सावंत, पूनम कुडाळकर यांचा अप्रतिम नृत्याविष्कार व जुगलबंदीचा आस्वाद शनिवारी सायंकाळी सखींनी घेतला.
लोकमतने ‘सखी मंच’च्या सदस्यांसाठी कसबा बावडा महासैनिक दरबार हॉलच्या लॉनवर लावणीचा कार्यक्रम झाला. लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी वेंकटेश ज्वेलर्सचे विशाल भारती, अॅड. मृदुला वाघमारे, सीईओ विवेक रणवरे व भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, सुधा भारतकुमार राण , नगरसेविका व सखी मंचच्या सदस्या उमा इंगळे उपस्थित होत्या. वेंकटेश ज्वेलर्स आणि प्रतिभा मिल्क कार्यक्रमाचे प्रायोजक होते.
टाळ्या, शिट्ट्या, रुमाल, फेटे, ओढणी उडविणे, लावण्यवतींसोबत नृत्य करण्याची एकही संधी सखींनी सोडली नाही. यंदा प्रथमच सखींसाठी लावणीचा दुरंगी सामना आयोजित केला होता. लावण्यवतींनी आपल्या जुगलबंदीने सखींना घायाळ केले.
सुरुवातीला अर्चना सावंत यांच्या गु्रपने ‘मनमोहना तू ’ या गीतावर लावणी सादर केली. त्यानंतर ‘या रावजी, बसा भावोजी’ या गीतावर तर अर्चनाच्या नृत्याला अक्षरश: टाळ्या, शिट्ट्या आणि ओढणी उडवित स्वत: मंचावर जाऊन सखींनी आनंद लुटला. त्यानंतर पूनम कुडाळकर हिच्या ‘कुणी तरी यावे मला फिरवायला’ , ‘सोडा राया नादखुळा’ ‘पप्पी दे, पप्पी दे पारुला’ या गीतावर तिच्यासोबत फुगडी घालून तिच्याबरोबर नृत्यामध्ये सहभागी झाल्या. अर्चना सावंत यांनी ‘पिंजरा’ या मराठी चित्रपटातील ‘गं साजणी’, ‘दिसला गं बाई दिसला, गालात खुदकुन हसला’ तर ‘गंमत-जंमत ’या चित्रपटातील ‘चोरीचा मामला, मामाही थांबला’ आणि ‘शांताबाईचा नखरा, चखरा’या लोकगीतांवर तब्बल १५ ते २० मिनिटे सखींनी अर्चना सावंत यांच्या ग्रुपबरोबर मंचवर व प्रेक्षकांत जाऊन नृत्य केले व त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रशिद पुणेकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सखी मंचच्या संयोजन समितीतील सदस्यांनी उत्कृष्ठ नियोजन केले. (प्रतिनिधी)