दलित महासंघाकडून ‘शेण फेको’
By Admin | Updated: January 17, 2015 00:41 IST2015-01-17T00:38:12+5:302015-01-17T00:41:51+5:30
निषेध : जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयावर आंदोलन

दलित महासंघाकडून ‘शेण फेको’
कोल्हापूर : जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयातील गैरकारभाराच्या निषेधार्थ आज, शुक्रवारी दुपारी दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी विचारेमाळ येथील कार्यालयासमोर ‘शेण फेको’ आंदोलन करून निषेध व्यक्त केला. सुनील वारे, वृषाली शिंदे अशा निषेधाच्या घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दुपारी साडेबाराच्या सुमारास कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत सोबत आणलेले शेण फेकून कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी हा प्रकार हाणून पाडत त्यांना आत जाण्यापासून रोखले. तरीही सर्वजण आत जाण्याची भूमिका आंदोलकांनी कायम ठेवली. शेवटी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष लालासाहेब नाईक यांच्यासह पाच-सहा जणांच्या शिष्टमंडळाला आत जाण्यास परवानगी दिली. कार्यालयात गेल्यावर ज्यांच्याविरोधात आपण आंदोलन करीत आहोत त्या अधिकारी वृषाली शिंदे यांना समोर पाहिल्यावर आंदोलकांचा पाराच चढला. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत त्यांच्या टेबलावर शेण फेकण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांचा हा पवित्रा पाहून पोलिसांना त्यांना अडवत हे शेण ताब्यात घेऊन कचराकुंडीत टाकले. संतप्त आंदोलकांनी वृषाली शिंदे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांना धारेवर धरले. काही वेळानंतर त्यांना निवेदन देऊन अधिकारी वृषाली शिंदे यांच्यासह दोषी अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष लालासाहेब नाईक यांच्यासह बाबासो दबडे, अनिल मिसाळ, जगदीश हेगडे, तेजस कंगणे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.