शक्तीपीठ अंबाबाई

By Admin | Updated: October 18, 2015 23:57 IST2015-10-18T22:18:34+5:302015-10-18T23:57:28+5:30

.पौराणिक ग्रंथांनुसार करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे स्वरूप हे आदिशक्तीचे मूळ पीठ आहे. दक्षप्रजापतीच्या यज्ञात आहुती दिलेल्या सतीचे नेत्र पडले ते हे स्थान.

Shaktipeeth Ambabai | शक्तीपीठ अंबाबाई

शक्तीपीठ अंबाबाई

स्त्रीशक्तीचा गौरव, घटाच्यारूपाने होणारी सृजनशीलतेची उपासना आणि देवीचा जागर करणाऱ्या नवरात्रौत्सवाचा मुख्य सोहळा म्हणजे शाही दसरा. साडेतीन शक्तिपीठांतील एक देवता असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईचा दसरा या नवरात्रौत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य. म्हैसूर, ग्वाल्हेर आणि कोल्हापूर संस्थान या राजघराण्यांना देवीच्या उपासनेशी जोडण्यात आल्याने येथील शाही दसरा देशभरातील भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे...पौराणिक ग्रंथांनुसार करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे स्वरूप हे आदिशक्तीचे मूळ पीठ आहे. दक्षप्रजापतीच्या यज्ञात आहुती दिलेल्या सतीचे नेत्र पडले ते हे स्थान. त्यामुळे येथे शिव-शक्ती, गणपती, कार्तिकेय असा परिवार आहे. देश-विदेशातील १०८, नंतर ५१ आणि महाराष्ट्रातील साडेतीन या सर्व शक्तिपीठांत अग्रस्थानी असलेले हे क्षेत्र आद्यशक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. नेत्र हे प्रकाश आणि तेजाचे प्रतीक म्हणून देशभरातील शक्तिपीठांत अंबाबाईला प्रमुख शक्तिपीठ म्हणून मान आहे.
मूर्तीच्या मस्तकावर नाग, लिंग, योनी ही काल, पुरुष आणि प्रकृती (म्हणजे शिवशक्ती) या तीन तत्त्वांची प्रतीके आहेत. हातात बीजफल आणि औषधी असलेले म्हाळुंग फळ, दुसऱ्या हातात पानपात्र, अन्य दोन हातांत गदा, ढाल ही आयुधं आहेत. तिच्यापासून ब्रह्मा, विष्णू, महेश निर्माण झाल्याने डोक्यावर शिव, हृदयात नारायण व चरणात ब्रह्मस्वरूप अशी त्रिगुणात्मिका आहे.
तसेच या देवतेमध्ये सती, पार्वती, महाकाली, लक्ष्मी, सरस्वती अशा सर्व स्त्री देवतांचेही मूळ स्थान आहे. म्हैसूर आणि ग्वाल्हेरनंतर कोल्हापूरचा शाही दसरा प्रसिद्ध आहे. या तीनही शहरांमध्ये देवीचा दसरा सोहळा आणि राजघराणे यांना एकाच धाग्यात गुंफण्यात आल्याने या सोहळ््याला शाही दसरा असे संबोधते जाते. कोल्हापुरात करवीरनिवासिनी अंबाबाई, छत्रपती घराण्याची जुना राजवाडा येथील तुळजाभवानी, गुरू महाराज यांच्या पालख्या आणि छत्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत हा शाही दसरा सोहळा होतो.
पूर्वी म्हणजे शके १८०० च्या शेवटच्या दशकात हा शाही दसरा सोहळा त्र्यंबोली टेकडीवर व्हायचा. मात्र, नंतर ब्रिटिश रेसिडन्सी आणि कोल्हापूरचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून चौफाळ््याचा माळ म्हणजे आताच्या दसरा चौकात शाही दसरा सोहळा होऊ लागला.
त्यावेळी भवानी मातेच्या पादुका हत्तीवरून या सोहळ््याला यायच्या. कोल्हापूर संस्थानच्या छत्रपतींसोबत भगवी ढाल, भगवी पताका, त्रिपटका, रिसाला, कोटकरी, विटेकरी, बाणदार, गायकवाड, यादव, पंतप्रतिनिधी असे मानकरी, सरदार असा शाही लवाजमा असायचा. साधारण १९३७ ला छत्रपतींनी मेबॅक कार घेतली. तेव्हापासून आजतागायत शाही लवाजम्यानिशी या कारमधून श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, यौवराज शहाजीराजे, यशराज राजे दसरा चौकात येतात. त्याचवेळी करवीरनिवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी आणि गुरूमहाराजांच्या पालख्याही आपल्या लवाजम्यानिशी येथे दाखल होतात.
येथे पोलीस बँड आणि मिलिटरी बँडच्यावतीने देवीला मानवंदना दिली जाते. त्यानंतर शाहू महाराज दसऱ्याच्या मुख्य सोहळ््याच्या ठिकाणी येऊन अपराजिता व शमी पूजन करतात. देवीची आरती होते. बंदुकीच्या फैरी झाडून देवीला सलामी दिली जाते आणि त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो.
छत्रपती सर्व मानकऱ्यांना सोने दिल्यानंतर मेबॅक कारमध्ये उभे राहतात आणि सर्व नगरवासीयांना सोने देत जुना राजवाड्यात दाखल होतात. येथे दसऱ्याचा दरबार भरवला जातो. संस्थानच्या सर्व मानकऱ्यांना सोने वाटले जाते. त्यानंतर पंचगंगा नदीतीरावरील समाधिस्थळीही सोने दिले जाते. अंबाबाईची पालखी मात्र नगरवासीयांना भेट देत त्यांना दर्शन देत मंदिरात येते. सिद्धार्थनगर, पंचगंगा नदी घाट, शुक्रवार पेठ, गंगावेश, गुजरी मार्गे रात्री पालखी मंदिरात दाखल होते. त्यानंतर पुन्हा पालखी सोहळा होतो. अशा रीतीने कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा होतो. अश्विन पौर्णिमेला देवस्थान समिती आणि महालक्ष्मी भक्त मंडळाच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन होऊन नवरात्रौत्सवाची सांगता होते.
^- इंदुमती गणेश

Web Title: Shaktipeeth Ambabai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.