ज्येष्ठांना मिळणार ‘शाहू’चे सहकार्य
By Admin | Updated: November 18, 2014 23:33 IST2014-11-18T21:14:02+5:302014-11-18T23:33:53+5:30
जयसिंगपुरातील सामाजिक उपक्रम : संभाजीराजे नाईक यांची माहिती

ज्येष्ठांना मिळणार ‘शाहू’चे सहकार्य
जयसिंगपूर : जयसिंगपूर शहर व मौजे संभाजीपूर गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच गरजूंना सेवा मिळाव्यात या सामाजिक बांधीलकीतून येथील राजर्षी शाहू विचार मंचच्यावतीने शाहू सेवा (मायेची सेवा) सुरू करणार असल्याची माहिती अॅड. संभाजीराजे नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शाहू सेवा नावाने सामाजिक उपक्रम सुरू करीत आहोत. पुणे येथील मंजिरी गोखले-जोशी व अॅड. विद्या गोखले यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून राजकारणविरहित सेवा केंद्राचे कामकाज राहणार आहे. एकाकी जीवन व्यथित करणाऱ्या वृद्धांची संख्या मोठी आहे. ज्येष्ठ व गरजंूसाठी ‘जिथे कमी, तेथे आम्ही’ ही संकल्पना राबवून विनामूल्य सेवा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष विठ्ठल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिलिंद साखरपे, शैलेश आडके यांनी मनोगत व्यक्त केले.
या लोकोपयोगी कार्यामध्ये सेवक सदस्य म्हणून सहभागी होणार असल्यास त्यांनी अॅड. संभाजीराजे नाईक, राजाराम चौगुले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या उपक्रमाच्या माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले. यावेळी जोतिराम जाधव, सुभाष भोजणे, डॉ. महावीर अक्कोळे, डॉ. अतिक पटेल, डॉ. राजेश बाफना, साजिदा घोरी, सुरेश शिंगाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)