शाहूपुरी, दिलबहार, पीटीएमचा स्फोटक हाफ संजय हंचनाळे

By Admin | Updated: February 17, 2017 01:42 IST2017-02-17T01:42:58+5:302017-02-17T01:42:58+5:30

मॅन आॅफ द टुर्नामेंटस्’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. हा त्याच्या जीवनातील एक आठवणीचा क्षण

Shahupuri, Dilbahar, PTM explosive Half Sanjay Hankanche | शाहूपुरी, दिलबहार, पीटीएमचा स्फोटक हाफ संजय हंचनाळे

शाहूपुरी, दिलबहार, पीटीएमचा स्फोटक हाफ संजय हंचनाळे

गोव्यामध्ये झालेल्या स्पर्धेत संजय हंचनाळेला ‘मॅन आॅफ द टुर्नामेंटस्’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. हा त्याच्या जीवनातील एक आठवणीचा क्षण आहे.संजयच्या मतानुसार कोल्हापुरात चांगली मैदाने उपलब्ध नाहीत. त्यामुळे फुटबॉलची म्हणावी इतकी प्रगती झाली नाही. कोल्हापूरपेक्षा पुणे शहर फुटबॉलमध्ये प्रगत होत आहे.
संजय राजाराम हंचनाळे याचा जन्म दि. ९ नोव्हेंबर १९६८ ला कोल्हापुरातील जवाहरनगरात झाला. हा परिसर मंगळवार पेठेला लागून असल्याने फुटबॉलचे वारे काही प्रमाणात या भागातही खेळले आहे. त्यामुळे फुटबॉलवेड्या लहान मुलांमध्ये संजय लहानपणीच सहभागी झाला. जवाहरनगर ते मंगळवार पेठेत लहान मुलांचे क्लब असत. त्या लहान क्लबमध्ये मुलांच्या नेहमी स्पर्धा होत. बहुधा टेनिस चेंडूच असे. सेंट झेवियर शाळेत आल्यापासून संजयची फुटबॉलची गोडी आणखी वाढली. गल्लीगल्लीतून होणाऱ्या लहान मुलांच्या ४ फूट ११ इंच उंचीच्या अटीतटीच्या सामन्यात संजय संधी मिळेल त्या प्लेसवर खेळू लागला. इथेच त्याची जादू दिसू लागली. सेंट झेवियर शाळेत शिक्षण घेत असताना खेळ शहरस्तरापर्यंतच पोहोचत असे. पुढे त्याने गोपालकृष्ण गोखले कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजच्या संघात संजयला सेंटर हाफ या महत्त्वाच्या जागेवर खेळण्याची संधी मिळाली. इथे त्याच्या खेळामध्ये परिपक्वता आली. १९ वर्षांखालील शालेय स्तरावरील सामन्यात सेंटर हाफ अथवा राईट, लेफ्ट कोणत्याही प्लेसवरून त्याचा खेळ उठावदार होऊ लागला.
संजयच्या पायात अफलातून ताकद होती. फुटबॉल खेळात असणाऱ्या सर्व तंत्रावर त्याची हुकूमत. विशेषत: बॉल कंट्रोलिंंग, बॉल ड्रिबलिंंग करीत आपल्या फॉरवर्ड खेळाडूला अचूक बॉल सप्लाय करण्याची किमया अजोड होती. संजयचा ‘हाफ’चा खेळ अतिशय तंत्रशुद्ध होता. अनेकवेळा चार-पाच प्रतिस्पर्धी खेळाडू चकवत संजयने गोल करून वाहवा मिळविली आहे. त्याच्या हाफ व्हॉली किक, लो ड्राईव्ह व हाय ड्राईव्ह किकमध्ये नजाकत होती.
यशवंत कातवरे याचवेळी शाहूपुरी फुटबॉल संघाचा संघटक व कर्णधार होता. तो आपल्या संघाची बांधणी करीत होता. संजयचा फुटबॉल यशवंतच्या नजरेतून सुटला नाही. यशवंतने संजयला आपल्या सीनिअर शाहूपुरी संघात हाफ या जागेवर सामील करून घेतले आणि संजयच्या खेळाचा परीघ विस्तारला. या संघात यशवंत कातवरे, बाबू सांगवडेकर, भोला सांगवडेकर, गिरीश शहा, बाळू रेडेकर हे साथीदार होते. या संघातून संजयचा खेळ चांगलाच उठावदार झाला. अनेक स्थानिक स्पर्धांत तो या संघातून खेळला. त्याचा हाफचा उत्कृष्ट खेळ पाहून पीटीएमसारख्या बलाढ्य संघात त्याला स्थान मिळाले. या संघात अफलातून हाफ खेळणारा आनंदा ठोंबरे, शरद पोवार, संभाजी जाधव यासारखे नामांकित खेळाडू सहकारी म्हणून लाभले. पुन्हा तिसऱ्यावेळी प्रसिद्धीच्या वलयात असणाऱ्या दिलबहार क्लबमध्ये त्याला संधी मिळाली. संजय आता दिलबहार क्लबमधून स्थानिक व बाहेरगावच्या स्पर्धा खेळू लागला.
स्थानिक सर्व स्पर्धा खेळून संजयने मिरज, सांगली, गडहिंग्लज, बेळगाव, पुणे, मुंबई इथल्या स्पर्धांतही चमक दाखविली. गोवा, हिंंगोली, जबलपूर येथील प्रेक्षकांकडून वाहवा मिळविली. संतोष ट्रॉफी स्पर्धेकरिता निवड होणे ही सन्मानाची बाब समजली जाते. संजयची सन १९९१ साली संतोष ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड झाली होती. संजयने पदवी शिक्षणाकरिता शहाजी सीनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. या कॉलेजकडून विभागीय व आंतरविभागीय स्पर्धेतून खेळताना संजयने विशेष चमक दाखविली. त्याचा नेत्रदीपक खेळ पाहून वेस्ट झोनकरिता शिवाजी विद्यापीठ संघात सन १९९३ आणि १९९४ अशी दोन वेळा जबलपूर आणि चंदीगड (पंजाब) येथील स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धांतही संजय विशेष प्रसिद्धी मिळवून गेला. गोव्यामध्ये झालेल्या स्पर्धेत संजयला ‘‘मॅन आॅफ द टुर्नामेंटस्’’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. हा त्याच्या जीवनातील एक आठवणीचा क्षण आहे.
संजयला फुटबॉलच्या प्रसिद्धी वलयामुळे अनेक जिवाभावाचे मित्र लाभले. संजयच्या मतानुसार कोल्हापुरातील आपल्या खेळाडूंना चांगली मैदाने उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोल्हापूरच्या फुटबॉलची म्हणावी इतकी प्रगती झाली नाही. कोल्हापूरपेक्षाही पुणे शहर फुटबॉलमध्ये प्रगत होत आहे. वयाच्या १३ व्या वर्षांपासून फुटबॉलवर वर्चस्व गाजविणारा संजय तब्बल २० वर्षे फुटबॉल खेळत राहिला.

(उद्याच्या अंकात : सुरेश जरग)

Web Title: Shahupuri, Dilbahar, PTM explosive Half Sanjay Hankanche

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.