पारदर्शक कारभारामुळेच ‘शाहू’ची प्रगती
By Admin | Updated: August 5, 2014 00:16 IST2014-08-04T23:07:16+5:302014-08-05T00:16:44+5:30
समरजितसिंह घाटगे : यमगे येथे घाटगे गटाचा मेळावा उत्साहात

पारदर्शक कारभारामुळेच ‘शाहू’ची प्रगती
मुरगूड : दुग्ध व्यवसाय अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला असल्याने जिल्ह्यासह राज्यातील अनेक दूध संघ बंद पडले; पण विक्रमसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनानुसार, पारदर्शकपणे व सभासद हिताचा कारभार केल्यानेच शाहू दूध संघाने प्रगती केली आहे, असे प्रतिपादन समरजितसिंह घाटगे यांनी केले.
यमगे (ता. कागल) येथे शाहू सहकारी दूध संस्थेच्या वतीने सभासदांना भांडी वाटप, सवलत कूपन वाटप, विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम व कार्यकर्त्यांचा मेळावा, अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच भारती किल्लेदार-पाटील होत्या.
यावेळी बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुनीलराज सूर्यवंशी यांनी संघाविषयी माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते सभासदांना भांडी व कूपन वाटण्यात आले. बिरदेव डोणे, शैलेंद्र कोंडेकर, अवधूत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. नारायण पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष दत्तामामा खराडे, संचालक वसंतराव पाटील, शाहू दूध संघाचे संचालक संजय पाटील, संचालक अमरसिंह घोरपडे, रामभाऊ खराडे, अनंतराव फर्नांडिस, हिंदुराव किल्लेदार, मारुती पाटील, संस्था अध्यक्ष प्रकाश देसाई, उपाध्यक्ष पांडुरंग कोंडेकर, सचिव रवींद्र पाटील उपस्थित होते. विजय गुरव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)