शाहूकालीन शाहूपुरी थोरली मस्जिद
By Admin | Updated: July 18, 2014 00:52 IST2014-07-18T00:35:45+5:302014-07-18T00:52:56+5:30
ऐतिहासिक महत्त्व : सातशे लोकांची नमाज पठणाची व्यवस्था

शाहूकालीन शाहूपुरी थोरली मस्जिद
एम. ए. पठाण - कोल्हापूर
शहरातील जुन्या मस्जिदमध्ये शाहूपुरी थोरली मस्जिदचा उल्लेख होतो. आज या मस्जिदीचे नवीन बांधकाम पूर्णत्त्वास आले आहे. मस्जिद पूर्ण करण्यात अन्य धर्मियांचेही सहकार्य लाभले आहे. रमजान महिन्यातील नमाज पठण, तरावीह पठण, रोजा इफ्तार, आदी धार्मिक विधीमध्ये मुस्लिम बांधव सहभागी होत आहेत.
साधारण १९०४ च्या दरम्यान शाहूपुरी वसाहत वसवत असताना राजर्षी शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार हजरतजी मौलवी सईदुल्ला मीर अहमद कुरेशी यांच्या पुढाकाराने आणि जमातीच्या मुस्लिम बांधवांच्या सहकार्याने येथील मस्जिद
उभारण्याचे काम झाले. त्यावेळेपासून शहरातील बिंदू चौकातील
उभारलेली बडी मस्जिद व शाहूपुरी
येथे उभारलेली थोरली मस्जिद असे संबोधले जाते. थोरली मस्जिद परिसरात हजरतजी यांची मुसाफिरखान, मदरसा, यतीन खाना उभारण्याची मनीषा होती. यासाठी त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात मार्गदर्शनही केले आहे. त्यासाठी येथील ट्रस्टी प्रयत्नशील आहेत.
९० वर्षांच्या कालखंडानंतर जुनी मस्जिद अपुरी पडत असल्याने व इतर इमारती जुन्या व जीर्ण झाल्यामुळे ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष निसार पठाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवीन प्रशस्त मस्जिद, व्यापारी व निवासी संकुल बांधण्याचा प्रस्ताव तयार केला व आवश्यक परवाना घेऊन साधारण २००४ पासून बांधकामाला सुरुवात केली. स्टेशन रोडलगत व्यापारी संकुल, त्यापाठीमागे मस्जिद संकुल व बाजूला निवासी संकुल पार्किंग व्यवस्था असे काम झाले आहे. हे काम पूर्ण होण्यात अन्य धर्मियांचेही सहकार्य लाभले.
मस्जिदीमध्ये सर्वसाधारण ७०० लोकांची नमाज पठणाची व्यवस्था झाली आहे. तसेच मस्जिदमध्ये पूर्वी पाण्याचा हौद होता. यामुळे हौदवाली मस्जिद अशीही ओळख होती, यासाठी आज येथे मोठा हौद बांधण्यात आला आहे. व्यापारी संकुलात २२ गाळे, तर ३३ आॅफिस गाळे आहेत. यामध्ये हिंदू-मुस्लिम भाडेकरू आहेत. येणाऱ्या भाड्यातून मस्जिदीच्या देखभालीचा उद्देश आहे.
येथे नमाज तरावीह पठण पेशमाम मौलाना अब्दुल राजिक सिद्धिकी करतात. तर बागी अब्दुल रज्जाक जमादार म्हणून काम
पाहतात. रोजा इफ्तारसाठी मस्जिदीच्या पाठीमागे मंडप उभारण्यात आला आहे. येथे मुस्लिम बांधव रोजा इफ्तारमध्ये सहभागी होतात.
शाहूपुरी थोरली मस्जिद
(जामा मस्जिद) ट्रस्टचे अध्यक्ष निसार पठाण, सेक्रेटरी हाजी नाजुद्दीन
मुजावर, विश्वस्त राजमहंमद ट्रेनर, सय्यद मकबूल लाड,
हाजी इस्माईल जमादार, सलीम
शेख असून प्रॉपर्टी मॅनेजर
म्हणून अय्याज पटवेगार काम
पाहतात.