शाहीर महोत्सवाची तयारी पूर्ण
By Admin | Updated: December 9, 2014 23:55 IST2014-12-09T23:30:34+5:302014-12-09T23:55:18+5:30
महापालिकेकडून आयोजन : ३० डिसेंबरला कार्यक्रम, सत्कार

शाहीर महोत्सवाची तयारी पूर्ण
कोल्हापूर : शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेने शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० डिसेंबरला होणाऱ्या या महोत्सवात जिल्ह्यातील शाहिरांचा सत्कार करण्यात येणार आहे. राम गणेश गडकरी सभागृहात होणाऱ्या या महोत्सवात जिल्ह्यातील दहा नामवंत शाहीर कला सादर करणार आहेत. रोख रकमेसह स्मृतिचिन्ह देऊन शाहिरांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती सचिन चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली.
महोत्सवात ज्येष्ठ, वयोवृद्ध शाहिरास रोख २१ हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी शाहिरांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील शाहिरांचा सन्मान करण्यात येणार आहे. महोत्सवात भाग घेऊन पोवाडा सादर करणाऱ्या शाहिरांची नावे शाहीरविशारद पिराजीराव सरनाईक विश्वस्त मंडळाच्या सदस्यांबरोबर चर्चा करून निश्चित करण्यात आली आहेत.
महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते व आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. सायंकाळी सहा वाजता बक्षीस समारंभ होणार आहे. (प्रतिनिधी)
महोत्सवात सहभागी शाहीर
शाहीर राजू राऊत, आझाद नायकवडी, दिलीप सावंत, रंगराव पाटील, सदाशिव निकम, रंगराव पाटील (महे), प्रा. सर्जेराव टिपुगडे, कृष्णात पाटील, बालशाहीर संकेत पाटील, तसेच शाहीर पिराजीराव सरनाईक यांचे सहकारी विनायक भैरू यादव हे शाहीर महोत्सवात सहभागी होणार आहेत.