शहाजी महाविद्यालय ठरले बहुजनांसाठी आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:27 IST2021-08-22T04:27:14+5:302021-08-22T04:27:14+5:30
कोल्हापूर : बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी शाहू शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याच आधारे ...

शहाजी महाविद्यालय ठरले बहुजनांसाठी आधार
कोल्हापूर : बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी शाहू शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याच आधारे कार्यरत असलेले शहाजी महाविद्यालय बहुजनांसाठी आधार ठरले, असे गौरवाेद्गार शाहू छत्रपती यांनी शनिवारी येथे काढले.
येथील शहाजी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवाच्या सांगता समारंभामध्ये ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, आमदार पी. एन. पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे उपस्थित होते.
शाहू छत्रपती म्हणाले, यापुढचा काळ अवघड आहे. शिक्षण संस्था वाढल्या आहेत. अशा काळात गुणवत्तेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत राहण्याची गरज आहे. कुलगुरू शिर्के म्हणाले, मी सुद्धा या बोर्डिंगचा विद्यार्थी आहे. येथील वि. रा. शिंदे अध्यासन केंद्रास चालना देण्याची गरज असून, त्यासाठी शिवाजी विद्यापीठ या महाविद्यालयाशी सामंजस्य करार करेल.
आमदार पी. एन. पाटील म्हणाले, जगाने तंत्रज्ञानात, संशोधनात भारताची मदत घ्यायला हवी अशा पद्धतीचे शिक्षण-संशोधन होण्याची गरज आहे. या शिक्षण संस्थेमध्ये सर्वसामान्य विद्यार्थी घडविण्यासाठी श्रीपतराव बोंद्रे आग्रही होते. डाॅ. डी. आर. मोरे, सुधाकर मानकर यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी ‘वाटचाल ५० वर्षांची’ स्मरणिका व ‘Our Research’ या संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन झाले. माजी प्राध्यापक, प्रशासकीय सहकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी केले. आभार डॉ. एस. व्ही. शिखरे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. सरोज पाटील व प्रा. पी. के. पाटील यांनी केले. संस्थेचे मानद सचिव विजयराव बोंद्रे, संचालक शिवाजीराव कवठेकर, माणिक मंडलिक, डॉ. एन. एस. जाधव, रवींद्र भोसले, मनीष भोसले, आदींसह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी उपस्थित होते.
चौकट
पुस्तक लिहिणाऱ्यांचे कॉलेज
सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, पुस्तक लिहिणाऱ्यांचे कॉलेज म्हणून शहाजी कॉलेजचे नाव आघाडीवर होते. ते यापुढेही तसेच राहण्यासाठी प्राध्यापकांनी अधिकाधिक संशोधन व लेखन करावे. पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दत्त मंदिरामध्ये या संस्थेची चार विद्यार्थ्यांवर सुरुवात झाली. त्याचा आज वटवृक्ष होताना खूप आनंद होत आहे.
२१०८२०२१ कोल शहाजी महाविद्यालय
कोल्हापुरातील शहाजी महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ शनिवारी झाला. यावेळी महाविद्यालयाच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या ग्रंथाचे प्रकाशन कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, शाहू छत्रपती, आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून माणिक मंडलिक, राहुल पाटील, डॉ. डी. आर. मोरे, शिवाजी कवठेकर, प्राचार्य आर. के. शानेदिवाण उपस्थित होते.
छाया.. आदित्य वेल्हाळ