पैशाच्या पावसाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण
By Admin | Updated: October 18, 2015 01:20 IST2015-10-18T01:16:03+5:302015-10-18T01:20:22+5:30
टोळी उघड : चौघे ताब्यात; कारवाईच्या भीतीने म्होरक्याचा मृत्यू

पैशाच्या पावसाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण
इचलकरंजी : भानामती-जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीचा शनिवारी शिवाजीनगर पोलिसांनी सापळा लावून पर्दाफाश केला. मात्र, पोलीस ठाण्यात आणल्यानंतर भीतीने या टोळीचा म्होरक्या भीमराव रामचंद्र शिंंदे (वय ६६, रा. वाठार) याच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान, शिंदेसह तिघांवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चौघांंना ताब्यात घेण्यात आले आहे.
भीमराव शिंदे याच्यासह सुरेश रामय्या स्वामी (३५, रा. कबनूर) व हणमंत जगन्नाथ राऊत (३४, रा. भोने माळ) हे तिघेजण काही दिवसांपासून शहर आणि परिसरात भानामती-जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलांचे लैंगिक शोषण करीत असल्याची लेखी तक्रार महिला दक्षता समिती सदस्यांनी पोलिसांकडे केली होती. त्यातील शिंदे हा भानामती विद्येद्वारे पैशांचा पाऊस पाडण्याचा दावा करीत होता. त्याने काही महिलांना हेरून असा प्रयोगही केला होता. या प्रयोगावेळी तो अंधाऱ्या खोलीमध्ये धूर निर्माण करून महिलांना बेशुद्ध करीत असे, त्याच स्थितीत हे त्रिकूट त्यांचे लैंगिक शोषण करीत असे. महिला शुद्धीवर आल्यावर तिला काही रक्कम देऊन त्यांची बोळवण केली जात असे. हा प्रकार महिला दक्षता समिती सदस्यांनी शिवाजीनगर पोलिसांना कळविला होता.
तिघांविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल
याप्रकरणी भीमराव शिंंदे याच्यासह स्वामी व राऊत यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच यापूर्वी या पैशांचा पाऊस प्रयोगाला शहरातील दोन महिला बळी पडल्या असल्याचेही बारी यांनी सांगितले.
त्यापैकी एक महिला चार महिन्यांपासून महिला दक्षता समितीच्या सदस्यांच्या संपर्कात होती. त्या आधारेच महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी या टोळीचा पर्दाफाश करण्यात मोलाचे सहकार्य केले.
त्याचबरोबर या टोळीला आणखी काही महिला बळी पडू नयेत, याची दक्षता म्हणून सापळा रचून
या टोळीचा पर्दाफाश केला असल्याचे महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संबंधित प्रकार शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा शहापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
या टोळीचा प्रमुख मृत भीमराव शिंदे हा पोलीस रेकॉर्डवरील संशयित असल्याचे समजते. त्याच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव, कोकण आणि विदर्भ याठिकाणी गुन्हे नोंद असल्याची माहिती पुढे येत आहे.
संशयिताचा पोलीस ठाण्यातच मृत्यू
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल माळी व सहकाऱ्यांनी शनिवारी दुपारी डेक्कनजवळील आंबेडकरनगर परिसरात सापळा लावला. भीमराव शिंदे हा ठरलेल्या घरात आल्यानंतर त्याच्याशी समितीच्या सदस्यांनी चर्चा करीत पैशांची आपणास गरज असल्याचे सांगितले. त्यावर शिंदे याने जो संवाद केला, त्याआधारे त्याला पोलिसांनी पकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले.
आपण पोलिसांच्या सापळ्यात पुरते अडकलो असल्याचे लक्षात आल्याने भीतीने शिंंदे याच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. त्याला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. संशयिताचा पोलीस ठाण्यातच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर तहसीलदार दीपकशिंदे यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.
सापळ्याची पूर्वतयारी शुक्रवारी केली
सापळा लावण्यासाठी शुक्रवारी शहरातील एका मध्यवर्ती हॉटेलमध्ये या टोळीबरोबर महिला दक्षता समितीच्या सदस्यांची प्राथमिक चर्चा झाली होती. तेथेच आज कोठे भेटायचे याचे नियोजन करण्यात आले होते. शुक्रवारच्या प्राथमिक चर्चेचे चित्रणही पोलिसांनी करून ठेवले होते. त्यानुसार शनिवारी हा सापळा लावण्यात आला होता.
‘गुप्तचर’कडूनही चौकशी
या घटनेनंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोल्हापूर येथील गुप्तचर विभागाचे डी. डी. कांबळे, आर. डी. कुंभार यांचे पथक शहरात दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत या पथकाचा तपास सुरू होता.(वार्ताहर)