साताऱ्यात सेक्स रॅकेटचा भांडाफोड
By Admin | Updated: August 23, 2015 23:50 IST2015-08-23T23:50:02+5:302015-08-23T23:50:16+5:30
दोघांना अटक : उच्चभ्रू वस्तीतील फ्लॅटमधून दोन मुलींची मुक्तता

साताऱ्यात सेक्स रॅकेटचा भांडाफोड
सातारा : शहरातील उच्चभ्रू वस्तीतील एका फ्लॅटमध्ये चालणाऱ्या देहविक्रयाच्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ‘मालकीण’ आणि दलाल अशा दोघांना अटक केली आहे.
‘पिटा’ आणि ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, दोन मुलींची मुक्तता केली आहे. श्रीदेवी मोहन राठोड (वय २९, रा. गुरुवार पेठ, सातारा) आणि गणेश आत्माराम कुंभार (२९, रा. शनिवार पेठ, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विसावा नाका परिसरातील उच्चभ्रूंच्या वसाहतीतील एका फ्लॅटमध्ये मुलींना आणून या दोघांनी देहविक्रयाचे रॅकेट सुरू केले होते. याबाबत माहिती मिळताच शनिवारी दुपारनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी तेथे छापा टाकला. या रॅकेटची श्रीदेवी राठोड चालक असून, गणेश कुंभार दलाल म्हणून काम करीत असल्याचे उघड झाल्याने दोघांना अटक करण्यात आली.
बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई करण्यात आली. या ग्राहकाकडून संबंधित मुलींनी पैसे स्वीकारताच त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि एका सरकारी आश्रमात त्यांची रवानगी करण्यात आली. या दोघींपैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. गुन्हे शाखेने याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, निरीक्षक राजीव मुठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान, अटक केलेल्या दोन्ही संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
‘पिटा’, ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई
या सेक्स रॅकेटप्रकरणी ‘इम्मॉरल ट्रॅफिक (प्रिव्हेन्शन) अॅक्ट’ (पिटा) अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच पीडित मुलींपैकी एक अल्पवयीन असल्यामुळे ‘प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल आॅफेन्स (पोक्सो) अॅक्ट’ही याप्रकरणी लागू केला आहे. दरम्यान, दोघींपैकी एक मुलगी मुंबईची, तर दुसरी वारजे (पुणे) येथील असल्याचे समोर आले आहे. संबंधित फ्लॅट संशयितांनी कऱ्हाड येथील व्यक्तीकडून भाड्याने घेतला होता, असेही तपासात पुढे आले आहे.