आजरा हायस्कूलमध्ये फलक रेखाटनातून महापुराची भीषणता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:30 IST2021-08-17T04:30:23+5:302021-08-17T04:30:23+5:30
गेली दीड वर्षे कोरोनाचे महासंकट, त्यातून सावरता सावरता अचानक जुलै महिन्याच्या अखेरीस महापुराचे संकट आले अन् अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त ...

आजरा हायस्कूलमध्ये फलक रेखाटनातून महापुराची भीषणता
गेली दीड वर्षे कोरोनाचे महासंकट, त्यातून सावरता सावरता अचानक जुलै महिन्याच्या अखेरीस महापुराचे संकट आले अन् अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त करून गेले. अनेकांच्या जीवनाचा खेळ खल्लास झाला.
जीवनाची राखरांगोळी होण्यासारखं संकट कोल्हापूर, सांगली, सातारा, अकोला, रायगड आदी भागांतील कुटुंबांवर आले.
महापुरामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली. अनेकांचा काडी-काडीने जोडलेला संसार डोळ्यादेखत दगड मातीत व पुरात वाहून गेला. अनेक मुकी जनावरे व जिवंत माणसं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. फक्त नि फक्त शिल्लक राहिले ते सुन्न करणार दृश्य आणि हंबरडा फोडणारा टाहो. याच महापुराची भीषणता व वास्तव चित्र दाखवण्याचा प्रयत्न आजरा हायस्कूलचे कलाशिक्षक तानाजी पाटील यांनी आपल्या रेखाटनातून केला आहे.
घरातील आई-बाबा देवाघरी गेले. डोक्यावरील छप्पर उदध्वस्त झाले. अशा अवस्थेत आपल्या आजोबाच्या खांद्यावर डोकं ठेवून धाय मोकलून रडणारी नात व हंबरडा फोडून रडणारा तिचा आजोबा हे वास्तव व मन नि:शब्द करणारं सगळ्याचं हृदय हेलावून टाकणारी दृश्ये खडूने रेखाटली आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद आहेत
ऑनलाईन शिक्षण चालू आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. म्हणून मला शाळेत जायचं हाय...म्हणणारा मुलगा...अशी हुबेहूब चित्रे आपल्या फलक लेखनातून केली आहेत.
रंगीत खडूच्या माध्यमातून महापुराचे भीषण वास्तव उत्कटपणे मांडण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. फळ्याच्या एका बाजूला उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना 'धीर सोडू नको व खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने संसार उभा करा..तुझी देवाला नक्कीच काळजी आहे’, असा संदेश आपल्या चित्रातून दिला आहे.
यासाठी सर्वांनी एक हात मदतीचा पुढे केला पाहिजे. पूरग्रस्त बांधवांना सढळ हाताने मदत करा, असे आवाहन आजरा हायस्कूल आजरा येथील कलाशिक्षक तानाजी पाटील यांनी फलक लेखनातून केले आहे.
फोटो ओळी : आजरा हायस्कूलमधील तानाजी पाटील या शिक्षकांनी रंगीत खडूच्या साहाय्याने महापुराची भीषणता दर्शविणारे रेखाटलेले दृश्य.
क्रमांक : १६०८२०२१-गड-११