किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST2021-05-05T04:40:32+5:302021-05-05T04:40:32+5:30

नंदकुमार ढेरे चंदगड : चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले पारगडवरील सर्व तलाव व विहिरी कोरड्या पडल्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली ...

Severe water shortage at Fort Pargad | किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई

किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई

नंदकुमार ढेरे

चंदगड : चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले पारगडवरील सर्व तलाव व विहिरी कोरड्या पडल्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांवर पावसाळ्यापर्यंत गाव सोडून अन्यत्र स्थलांतरित होण्याची नामुष्की ओढवली आहे. सुटीच्या कालावधीत गावी येणारे पुणे- मुंबई येथील चाकरमान्यांचीही मोठी अडचण झाली आहे. शिवकाळापासून पारगडावर गणेश, फाटक, गुंजन व महादेव या चार तलावांसह १८ विहिरींची नोंद आहे. यातील महादेव तलाव वगळता इतर ३ तलाव वापरात असले तरी सद्य:स्थितीत तीनही तलाव कोरडे पडले आहेत. १८ विहिरींपैकी वापरात असलेल्या ३-४ विहिरीही पूर्णत: कोरड्या पडल्या आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत हीच परिस्थिती असून, एप्रिल- मे महिन्यांत पावसाळा सुरू होईपर्यंत गडावरील रहिवाशांना पाण्याअभावी स्थलांतरित व्हावे लागत आहे. त्यामुळे मुंबई- पुण्यासह बाहेर काम करणाऱ्या चाकरमानी मंडळींना सुटी असूनही सहकुटुंब आपल्या गावी काही दिवस राहण्याचे भाग्य लाभत नाही. ऐतिहासिक वारसा लाभलेला पारगड छत्रपती शिवरायांनी बांधलेला शेवटचा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या उन्हाळी सुटीतील पर्यटकांनाही पाणीटंचाईच्या झळांनी होरपळण्याची वेळ येत आहे. सात-आठ वर्षांपूर्वी राबविलेल्या नळपाणी योजना व अन्य सुधारणांचेही शासन व पर्यटन विभागाच्या दुर्लक्षामुळे तीनतेरा वाजले आहेत. शासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीन वृत्तीमुळे पारगड रहिवाशांना पाणी, आरोग्य आदी मूलभूत सुविधांअभावी जीवन कंठावे लागत आहे. ग्रामस्थांना चार- पाच किलोमीटरवरून पाणी आणून जगण्याची वेळ आली आहे. किल्ल्याला पाणीटंचाईपासून मुक्त करण्याची आर्त हाक पारगड ग्रामस्थांनी शासनाला दिली आहे.

-

टँकरने तलाव पुनर्भरणाची मागणी

गडावरील दरवर्षी ओढवणाऱ्या पाणीटंचाईवरील कायमस्वरूपी उपाययोजनांसह सद्य:स्थितीत टँकरने पाणीपुरवठा करून गडावरील गणेश व फाटक तलाव टँकरने भरून घ्यावीत, अशी मागणी कान्होबा माळवे, प्रकाश चिरमुरे, रघुवीर शेलार आदींनी केली आहे.

फोटो ओळी :

पारगड (ता. चंदगड) येथील पाण्याअभावी कोरडा पडलेला गणेश तलाव. क्रमांक : २३०४२०२१-गड-०३

Web Title: Severe water shortage at Fort Pargad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.