पावसाऐवजी घामाच्या धारा
By Admin | Updated: August 20, 2015 00:39 IST2015-08-20T00:39:43+5:302015-08-20T00:39:43+5:30
बळिराजा हवालदिल : उष्म्यात कमालीची वाढ; पिके, वैरणीची परिस्थिती गंभीर

पावसाऐवजी घामाच्या धारा
कोल्हापूर : जिल्ह्यासह शहरात बुधवारी दिवसभर ऐन पावसाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव आला. कडाक्याच्या उन्हामुळे दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत होती. उष्मा वाढल्याने खरीब हंगाम धोक्यात आला असून सर्वच पिके वाळत आहेत. परिपक्वतेच्या अवस्थेत असतानाच पावसाने पाठ फिरविल्यामुळे सद्य:स्थितीमध्ये उत्पादन ३० टक्के घटणार आहे. यामुळे बळिराजा हवालदिल झाला आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीच्या टप्प्यात झालेला चांगला पाऊस, उन्हाळ्यातील वळवाची बरसात यामुळे जिल्ह्यात पेरण्या वेळेवर झाल्या. उगवणही चांगली झाली. उघडिपीनंतर पाऊस झाल्यामुळे पिकांची वाढही जोमाने झाली; पण गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. अधूनमधून पडणाऱ्या हलक्या सरींमुळे जमिनीत पुरेशा प्रमाणात ओल निर्माण होत नसल्याचे चित्र आहे. झाडाखालील जमीनही भिजलेली नाही. खडकाळ जमिनीतील पिके वाळली आहेत. जोरदार पाऊस होईल असे गृहीत धरून शेतकऱ्यांनी पिकांना खतांचा डोस दिला आहे. आंतरमशागतीची कामे चांगली झाली आहेत. मात्र, अपेक्षित पाऊस नसल्यामुळे खरीप पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पाणी देत आहे. नदी, नाले, ओढ्यांतील पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा स्थिर आहे. मात्र वैरणीचा प्रश्न भीषण झाला आहे. जनावरांना चारा कोठून आणायचा, असा प्रश्न भेडसावत आहे. वैरणीअभावी शेतकऱ्यांचा कल जनावरे विकण्याकडे वाढला आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिक गारवा शोधताना दिसत होते. ऐन पावसाळ््यात पारा वाढल्याने कार्यालयात, घरात पंख्यांची गरगर सुरू असल्याचे दिसत होते.
( प्रतिनिधी )
पाऊस नसल्यामुळे सर्वच पिके वाळत आहेत. शेतकरी चिंतेत आहे. पिके पोसवण्याच्या अवस्थेत पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतमालाच्या उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घट होणार आहे.
- सुधीर कानडे,
शेतकरी (दुंडगे, ता. गडहिंग्लज)
पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास खरीप पिकांचे उत्पादन ३० टक्क्यांपर्यंत घटणार आहे. वैरणीची टंचाई भासणार आहे.
- चंद्रकांत सूर्यवंशी,
कृषिविकास अधिकारी
जिल्ह्यात ९९ टक्के पेरण्या
तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र टक्केवारीत असे : हातकणंगले - ८९.१, शिरोळ- ९२.६, पन्हाळा- ९८.२१, शाहूवाडी- ८९.६, राधानगरी- १००, गगनबावडा- १०१, करवीर- १०३, कागल- ९९.३७, गडहिंग्लज- १०८, भुदरगड- १००.५८, आजरा- ९९.९७, चंदगड- ११५.४७.
मान्सूनची वाटचाल नियमित स्वरुपात आणि समाधानकारक नसल्याने पावसाने ओढ दिली आहे. यात सुधारणा होण्याची सध्या चिन्हे दिसत नाहीत.
शहरातील कमाल तापमान अंश सेल्सियसमध्ये
मंगळवार- २८
बुधवार- ३१
गुरुवार - ३०