कोल्हापूर : केर्ले फाटा (ता. करवीर) परिसरात आलिशान चारचाकी वाहनांतून गुटख्याची विनापरवाना वाहतूक करताना करवीर पोलिसांनी पकडले. या कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे सात हजारांचा गुटखा तसेच चारचाकी गाडी जप्त केली. अक्षय कृष्णात सिद (वय २४, रा. जुने पारगाव, ता. हातकणंगले) आणि करण हनुमंत जाधव (२१, रा. कुरळप, ता. वाळवा, जि. सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केर्ली येथे एका चारचाकी आलिशान वाहनातून गुटख्याची विनापरवाना वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ही गाडी जप्त केले. त्यामध्ये पान मसाल्याची ४५ पाकिटे, सुगंधी सुपारीची ४३ पाकिटे असा गुटखा पान मसाला गठीत होऊ शकेल, असे पदार्थ जप्त केले. ही कारवाई करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या पथकाने केली.