कामाच्या तणावातून वर्षभरात सात पोलिसांचा अंत
By Admin | Updated: May 22, 2015 00:39 IST2015-05-22T00:36:48+5:302015-05-22T00:39:32+5:30
कोल्हापूर पोलीस : काम संपण्याची निश्चित वेळ नसणे, वरिष्ठांकडून अपमानित करणे, आदी कारणे

कामाच्या तणावातून वर्षभरात सात पोलिसांचा अंत
एकनाथ पाटील - कोल्हापूर -निश्चित नसलेले ड्यूटीचे तास, खाण्यापिण्याच्या अनिश्चित वेळा, कामाचा अतिरिक्त ताण, हक्काची साप्ताहिक सुटीही नाकारली जाणे, घरापासून दूर असलेले पोलीस ठाणे, प्रवासात जाणारा वेळ आणि ठाण्यात गेल्यानंतर केवळ वरिष्ठच नव्हे, तर सामान्य जनतेकडून मिळणाऱ्या वागणुकीने तो खचला जातो. अशा परिस्थितीने वर्षभरात कोल्हापूर पोलीस दलातील सात पोलिसांचा मृत्यू झाल्याची दप्तरी नोंद आहे.
वाकोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची हत्या आणि पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या या घटनेने राज्यात खळबळ उडाली. त्यामुळे पोलिसांच्या आत्महत्येचा विषय ऐरणीवर आला. राज्यात गेल्या चार वर्षांत १२९ पोलिसांच्या आत्महत्या झाल्याची गृहखात्याची माहिती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात २९ पोलीस ठाणी आणि तीन हजारांच्या आसपास कर्मचारी आहेत. त्यामुळे लोकसंख्येचा विचार केला तर १६०० लोकांच्या मागे एक पोलीस अशी स्थिती आहे.
अधिकाऱ्यांच्या ‘मर्जी’तल्या पोलिसांवर मेहेरनजर केली जात असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण कमी असतो आणि इतरांवर बोजा वाढतो. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी तसेच ईद सणानिमित्त बंदोबस्त लावला जातो. त्यामुळे हक्काची साप्ताहिक सुटीही नाकारली जाते. मंत्र्यांचा बंदोबस्त तर पाचवीलाच पूजला आहे. पोलिसांतील नैराश्याची ठिणगी तेथेच पडते. कनिष्ठ स्तरावरील पोलीस या आगीत जळत असतो. अशातच नैराश्य आलेला हा पोलीस त्यातून बाहेरच पडत नाही आणि आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारतो.
पोलीस म्हणतात...
दैनंदिन कामातून वेळ मिळत नसल्यामुळे तसेच अधिक कामाचा ताण असल्यामुळे शारीरिक स्वास्थ्य राखणे अवघड असल्याचे काही पोलिसांचे म्हणणे आहे. अनेकदा १२ ते १८ तास ड्यूटी करावी लागते. महत्त्वाचे कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने, राजकीय सभा, उत्सव यांमुळे साप्ताहिक सुट्याही रद्द केल्या जातात. बंदोबस्तामध्ये किंवा दैनंदिन कामात जेवणाच्या वेळाही निश्चित नसतात. अनेकदा जेवणच करायला वेळ मिळत नाही. दिवसातील ६० टक्के वेळ ‘आॅन ड्यूटी’मध्ये जात असल्यामुळे पुरेशी झोपही मिळत नाही. अशा परिस्थितीत शारीरिक स्वास्थ्य कसे टिकणार, असा प्रश्नही काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.
यांचा झाला मृत्यू
पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र गोपाळ कुलकर्णी, विकास विलास गायकवाड, पिराजी महिपती कुसाळे, शिवाजी रामू कोळी, बळवंत सुबराव शिंदे, सदाशिव भरमाप्पा अंबी. शेतकरी आंदोलनाच्या दंगलीमध्ये गंभीर जखमी होऊन मोहन दिनकर पोवार यांचा मृत्यू.
पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलिसांची शारीरिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने विशेष कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. योग, कार्यशाळा, परेड, ताणतणावातून मुक्ती मिळण्यासाठी आरोग्य कार्यशाळा, आदींचे प्रशिक्षण घेतले जाते.
- किसन गवळी, गृह पोलीस उपअधीक्षक