खिद्रापूर सरपंचासह सातजण अपात्र
By Admin | Updated: November 20, 2015 00:06 IST2015-11-19T23:25:53+5:302015-11-20T00:06:28+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई : निवडणूक खर्चाचा हिशेब भोवला

खिद्रापूर सरपंचासह सातजण अपात्र
जयसिंगपूर : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या सन २०१२ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामविकास आघाडीतून नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते़ त्यापैकी सात सदस्यांनी निवडणूक खर्चाचा हिशेब न दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच, उपसरपंचांसह सात सदस्यांना अपात्र ठरविले.
खिद्रापूर येथे २०१२ मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यामध्ये ग्रामविकास आघाडीतून सरपंच गीता गणेश पाखरे, उपसरपंच बसगोंडा पाटील, सदस्य सुदर्शन बडसुंके, कुलदीप कदम, सरोजनी लडगे, प्रसाद रायनाडे, आयेशाबी कागवाडे हे सातजण निवडून आले होते. या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडणुकीचा हिशेब न दिल्याने खिद्रापूर येथील दिलीप आप्पासो कुगे यांनी २८ मे २०१५ रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार देऊन त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी सबळ पुराव्यांच्या आधारे या सातजणांना अपात्र ठरविले आहे. पुढील पाच वर्षांसाठी त्यांना निवडणूक लढविता येणार नाही, असा आदेश आहे़ जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे ग्रामपंचायत बरखास्त होऊन प्रशासक येण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे गावात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
कारवाई झालेल्यांमध्ये सरपंच गीता गणेश पाखरे, उपसरपंच बसगोंडा पाटील, सदस्य सुदर्शन बडसुंके, कुलदीप कदम, सरोजनी लडगे, प्रसाद रायनाडे, आयेशाबी कागवाडे यांचा समावेश.
मुदतीत निवडणूक खर्च दाखल न केल्यामुळे दिलीप कुगे यांनी २८ मे २०१५ रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
अपात्र पदाधिकाऱ्यांना आता पुढील पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नाही. कारवाईने ग्रामपंचायतीत प्रशासक नियुक्त होण्याची शक्यता आहे.