शेतकरी संघाचे अध्यक्षांसह सात संचालकांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:51+5:302021-07-14T04:28:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या उर्वरित अध्यक्ष जी. डी. पाटील यांच्यासह उर्वरित सात संचालकांनी साेमवारी राजीनामे ...

शेतकरी संघाचे अध्यक्षांसह सात संचालकांचे राजीनामे
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या उर्वरित अध्यक्ष जी. डी. पाटील यांच्यासह उर्वरित सात संचालकांनी साेमवारी राजीनामे दिले. त्यामुळे संघावर प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून आज, मंगळवारी प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया होण्याची दाट शक्यता आहे. बरखास्तीच्या अगोदरच अध्यक्षांसह संचालकांनी घराकडे जाण्याचा निर्णय घेतला.
गेल्या पाच वर्षांत संचालक मंडळाच्या चुकीचा कारभार, शाखांतील भ्रष्टाचारामुळे संघाचा कारभार चांगलाच चर्चेत राहिला. त्यानंतर गेल्या महिन्याभरापासून संचालकांचे राजीनामे आणि प्रशासक नियुक्ती चर्चेत राहिली. संघाच्या १९ पैकी पाच संचालकांचे निधन झाले, तीन अपात्र ठरले, तर तिघांनी राजीनामे दिल्याने संचालक मंडळातील ११ पदे रिक्त राहिली. संचालक मंडळ अल्पमतात आल्याने संघावर प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सुरू केली. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी तीन राजीनामे दिलेल्या संचालकांसह अकरा जणांना नोटीस काढून आठ दिवसांत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत आज संपत आहे. तोपर्यंतच सात संचालकांनी अध्यक्ष जी. डी. पाटील यांच्याकडे तर, पाटील यांनी आपला राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविला आहे. सगळे राजीनामे मंजूर झाल्याने आज किंवा उद्या, बुधवारी प्रशासक नियुक्त होणार आहे.
भोसलेंच्या राजीनाम्याच्या तयारीनंतर शिवाजीराव कदम, मानसिंगराव जाधव व विजयादेवी राणे यांनी राजीनामे दिल्यानंतर ज्येष्ठ संचालक व्यंकाप्पा भोसले यांनी राजीनामा देत असल्याचे गटनेते युवराज पाटील यांना सांगितले होते. तेव्हापासून भोसले अस्वस्थ होते. त्यानंतरच सगळ्यांनी राजीनामे देण्याची सूचना नेत्यांनी दिली.
संघाच्या कारभाराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. जे चांगले होते, त्याला पाठिंबा दिला आणि जे चुकीचे होते, त्याला विरोध केला. संचालक मंडळ सभेला गैरहजर राहून अथवा राजीनामा देऊन अंकुश राहणार नव्हता. शेवटपर्यंत चुकीच्या कारभाराविरोधात संघर्ष करत राहिलो.
- व्यंकाप्पा भोसले, संचालक, शेतकरी संघ
गेल्या पाच वर्षांत कारभारी संचालकांनी जे कर्म केले, त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. गोरगरिबांचा संघ टिकला पाहिजे, यासाठी आपण टोकाचा संघर्ष केला. नियतीलाही हेच अपेक्षित होते.
- सुरेश देसाई, माजी संचालक
यांनी दिले राजीनामे -
जी. डी. पाटील (अध्यक्ष), शशिकांत पाटील-चुयेकर, यशवंत पाटील, अमरसिंह माने, विजयकुमार चौगले, विनोद पाटील, बाळकृष्ण भोपळे, व्यंकाप्पा भोसले.