खंडणीप्रकरणी सात अटकेत

By Admin | Updated: July 8, 2016 01:11 IST2016-07-08T01:11:08+5:302016-07-08T01:11:27+5:30

पाच कोटींची मागणी : अटकेची भीती दाखवून ३१ लाख ५० हजार लुटले; हुपरीच्या सहायक फौजदारासह पोलिसाचा समावेश; महिलेच्या फिर्यादीनंतर कारवाई

Seven accused in ransom | खंडणीप्रकरणी सात अटकेत

खंडणीप्रकरणी सात अटकेत

कोल्हापूर : खाकी वर्दीचा धाक दाखवत पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी पुण्यातील महिलेसह तिच्या मानलेल्या भावास वेठीस धरुन ३१ लाख ५० हजार रुपये लुटल्याप्रकरणी हुपरी पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार, पोलिस कॉन्स्टेबलसह सातजणांना गुरुवारी कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्या महिलेने दिलेली फिर्याद व सीसीटीव्हीचे फुटेज यामुळे ही घटना उघडकीस आली असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना एप्रिल-मे २०१६ या कालावधीत घडली होती.
सहायक फौजदार संजय आनंदराव लोंढे (वय ४५), पोलिस कॉन्स्टेबल बाबूमियॉँ अब्दुलमस्जिद काझी (बक्कल नंबर २११६), फैय्याज बादशहा शेख (४७, रा. द्वारका सृष्टी अपार्टमेंट, कदमवाडी), जितेंद्रकुमार रामनरेश शर्मा (३३, रा. १७/१, गणेश कॉलनी, न्यू सांगवी, गणेश शितोळे यांच्या घरी, पुणे), वसंत धनाजीराव पाटील (४१, रा. १७५, अंबाबाई मंदिराशेजारी, पाटील गल्ली, हुपरी), आशिष बाळासो मायगोंडा (२८, रा. रेंदाळ), सदानंद प्रभाकर कांबळे ऊर्फ ठोंबरे (३२, रा. हुपरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या सर्वांवर कट रचणे, दरोडा, विनयभंग असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे कागल पोलिसांत दाखल झाले असून, आठवा संशयित दादासो शिवाजी कुंडले (रा. हुपरी) याचा पोलिस शोध घेत आहेत. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली. (प्रतिनिधी)

फैय्याज, शर्मा व वसंत पाटील सूत्रधार
संबंधित महिला व गिरीश गायकवाड हे दोघेजण कामानिमित्त इंदौरला गेल्याची माहिती संशयित फैय्याज शेख व जितेंद्रकुमार शर्मा या दोघांनी इतर संशयितांना दिली. त्यानंतर दि. २६ एप्रिलला त्यांनी इंदौरला जाऊन पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. यातील फैय्याज, जितेंद्रकुमार शर्मा व वसंत पाटील हे तिघेजण मुख्य सूत्रधार असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे, असे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले.


दोन दिवसांत चेक वटविले...
संबंधित महिलेने हुपरीतील विजय हिराकुडे या व्यक्तीच्या बँक खात्यावर आॅनलाईन पैसे भरले. त्यानंतर ५ व ६ मे २०१६ रोजी संशयितांनी नऊ-नऊ लाख रुपयांचे चेक वटवून रक्कम घेतल्याचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी अटकेनंतर संशयितांची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली.


सीसीटीव्हीमध्ये संशयितांचे फुटेज ...
पुणे येथील या महिलेच्या घरी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये संशयितांचे फुटेज मिळाले होते. तिने पोलिसांकडे लेखी तक्रार केल्यानंतर हे फुटेज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना दाखविले. त्यानंतर पोलिसांनी तपास करून गुरुवारी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह सातजणांना बेड्या ठोकल्या.


या प्रकरणात हुपरी पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- प्रदीप देशपांडे, जिल्हा पोलिस अधीक्षक, कोल्हापूर.

Web Title: Seven accused in ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.