महापालिका सभेच्या कोरमसाठी ‘सेटिंग’

By Admin | Updated: March 10, 2015 00:16 IST2015-03-10T00:11:43+5:302015-03-10T00:16:45+5:30

महापौरांची नवी खेळी : सोमवारच्या महासभेसाठी सत्यजित कदम यांच्यासह २० नगरसेवक उपस्थित राहणार

'Setting' for quorum for municipal meeting | महापालिका सभेच्या कोरमसाठी ‘सेटिंग’

महापालिका सभेच्या कोरमसाठी ‘सेटिंग’

कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीने महापौरांचे खच्चीकरण करण्यासाठी बोलाविलेल्या विशेष सभेला नामंजूर केल्यानंतर आता महापौर तृप्ती माळवी यांनी सोमवारी (दि. १६) महासभा बोलविली आहे. त्या अनुषंगाने कोरमसाठी २८ नगरसेवकांची जमवाजमव सुरु केली आहे. नगरसेवक सत्यजित कदम यांच्या नेतृत्वाखाली २०हून अधिक नगरसेवक सभेला उपस्थित राहणार असून, शह देण्यावरून महापालिकेत कुरघोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे.महापौरांची गाडी व विशेष सेवा काढून घ्याव्यात, त्यांनी दिलेले प्रशासकीय आदेश अमान्य करावेत यासाठी सत्ताधारी आघाडीने बोलाविलेली विशेष सभेची मागणी महापौर माळवी यांनी अमान्य केली. अशा दोन मागण्या अमान्य केल्यानंतर महापौरांचे पद धोक्यात येणार आहे. मात्र महापौरांना कोंडीत पकडण्याची ही खेळी आता विरोधकांवरच उलटविण्याचा डाव महापौर समर्थकांनी खेळला आहे. सोमवारी महासभेचे आयोजन करून सभेपुढे मागील चार तहकूब सभेतील विषय चर्चेसाठी ठेवले आहेत. यातील अनेक विषय नेत्यांसह नगरसेवकांच्या जिव्हाळ्याचे आहेत. सोमवारी सभा कोरमअभावी तहकूब झाल्यास पुन्हा मंगळवारी सभा बोलाविण्यात येणार आहे. दुसरी सभा संख्याबळाअभावी तहकूब झाल्यास त्यानंतर अर्ध्या तासात पुन्हा होणाऱ्या सभेला कोरमची आवश्यकता नाही. महापौरांच्या या नव्या खेळीमुळे सत्ताधारी आघाडीत खळबळ उडाली आहे.बगीचाची कटकट संपविणारमहाडिक गटाला शह देण्यासाठी राजाराम कारखान्याच्या गाडीअड्ड्याची जागा बगीचासाठी आरक्षित करणे हा विषय माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या समर्थकांनी काही महिन्यांपूर्वी स्थायी समितीपुढे आणला होता. या सभेत हा ठराव नामंजूर करून या जागेवरील आरक्षणाची कटकट संपविली जाणार आहे. टेंबलाईवाडी येथील टिंबर मार्केटसाठी ४५ हजार चौरस मीटर आरक्षित जागेपैकी बारा हजार चौ.मी. जागा आय.टी. पार्कसाठी आरक्षणाचा प्रस्ताव आहे. मागील सभेत काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी या ठरावास उपसूचनेची मागणी केली होती. आता हा विषय मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. नगरसेवक सत्यजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी महापौरांच्या दालनात महाडिक समर्थक नगरसेवकांची बैठक झाली. पक्षाने पाठविलेल्या कारणे दाखवा नोटिसीला न जुमानता सोमवारी होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्याचे बैठकीत ठरले. कोरमची संख्या सहज पूर्ण करू, असा विश्वास कदम यांनी यावेळी व्यक्त केला. किरण शिराळे, सुभाष रामुगडे, माधुरी नकाते, राजू घोरपडे, आदी नगरसेवक उपस्थित होते. लाचखोरी प्रकरणात अडकल्याने महापौरांवर कारवाई करण्याबाबत आयुक्तांनी नगरविकास विभागाकडे अभिप्राय मागितला आहे. या अनुषंगाने महापौरांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी मंत्रालयातून सूत्रे हलविण्यासाठी नगरसेवकांचा एक गट मुंबईला रवाना झाला आहे.

Web Title: 'Setting' for quorum for municipal meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.