लग्नापूर्वीच अपेक्षांचा प्राधान्यक्रम ठरवा

By Admin | Updated: April 27, 2015 00:18 IST2015-04-26T23:56:47+5:302015-04-27T00:18:52+5:30

प्रियदर्शिनी हिंगे : 'जोडीदार निवडताना' कार्यक्रमात विवाहोच्छुकांनी साधला दिलखुलास संवाद

Set priorities for expectations before marriage | लग्नापूर्वीच अपेक्षांचा प्राधान्यक्रम ठरवा

लग्नापूर्वीच अपेक्षांचा प्राधान्यक्रम ठरवा

कोल्हापूर : प्रेमभावना आणि परस्पर संवादाच्या आधारावरच विवाहसंस्था टिकून राहते. त्यामुळे भावी जोडीदाराकडून पैसा, रूप आणि परंपरा याबाबतच्या अपेक्षा लवचिक ठेवल्या पाहिजेत. या अपेक्षांचा प्राधान्यक्रम लग्नापूर्वीच निश्चित केल्यास आयुष्य आनंदमयी होईल, असा कानमंत्र पॉझिटिव्ह साथी डॉटकॉमच्या प्रकल्प समन्वयक आणि प्रसिद्ध विवाह समुपदेशिका प्रियदर्शिनी हिंगे यांनी दिला. ‘लोकमत सखी मंच’ आणि अथर्व वधू-वर सूचक केंद्रातर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘जोडीदार निवडताना’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बसंत-बहार रोड येथील मधुसूदन हॉल येथे कार्यक्रम झाला.
हिंगे म्हणाल्या, जोडीदारांकडून अवास्तव अपेक्षा, आर्थिक सुबत्तेचा आग्रह, लग्नाकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोन, पालकांचा अवाजवी हस्तक्षेप यामुळे विवाहसंस्थेवर परिणाम होत आहे. तडजोडीनंतर विवाह झाल्यानंतरही घटस्फोटाच्या आणि आत्महत्येच्या घटना घडत आहेत. अगदी सुखवस्तू कुटुंबेही याला अपवाद नसल्याचे चित्र आहे. परस्परांना प्रेम आणि जिव्हाळ्याचा आधार देण्यासाठी विवाहसंस्था निर्माण झाली आहे, याचे भानच समाजाला राहिलेले नाही.
रूप, पैसा या आधारावरच आजही लग्ने ठरविली जात आहेत. लग्न ठरविण्यापूर्वी मुलामुलींची मते विचारात घेणे आवश्यक आहे. वधूवरांमध्ये लग्न ठरविण्यापूर्वी परस्पर संवाद घडवून आणला, तर त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येणार नाहीत. वधूवरांनीही जोडीदार निवडताना कुणीतरी सांगतंय म्हणून ऐकण्यापेक्षा स्वत:च्या पातळीवर एकमेकांच्या स्वभावाची चाचपणी करणे गरजेचे आहे. जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांचा प्राधान्यक्रम ठरविण्याबरोबरच आपण कोणकोणत्या बाबतीत तडजोडी करू शकतो, हे ठरविले तर आयुष्याचा प्रवास सुखकर होईल, असा विश्वास हिंगे यांनी व्यक्त केला.
त्या पुढे म्हणाल्या, विवाहसंस्थेत काळानुरूप बदल केले पाहिजेत. पतीनेच आपल्या जीवनशैलीवर खर्च केला पाहिजे, हा पत्नीचा आग्रह चुकीचा आहे. स्त्री-सक्षमीकरणाचे युग सुरू आहे. त्यामुळे मुलींनी केवळ नवऱ्या मुलानेच कमवले पाहिजे, हा दृष्टिकोन बाजूला ठेवला पाहिजे. दोघांनीही एकमेकांना समजून घेण्यास वेळ दिला पाहिजे. सहकाऱ्याच्या प्रेमाची भाषा समजायला वेळ लागतो. ही भाषा समजली की, आपोआपच कौटुंंबिक स्वास्थ्य प्राप्त होईल.
यावेळी अथर्व वधूवर सूचक केंद्राचे संचालक अजित तांबेकर यांनी इच्छुक वधूवरांची मोफत नोंदणी केली. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.


एचआयव्ही तपासणीचा आग्रह धरा
नियोजित वधूवरांनी इतर चौकशीबरोबरच दोघांचीही एचआयव्हीची तपासणी केलीच पाहिजे. याबाबत पालकांनी तसेच संबंधित वधूवरांनी सामाजिक प्रतिष्ठेचा आव न आणता पुढाकार घेतला पाहिजे. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या गावातील नागरिकांनी एचआयव्हीची तपासणी केल्याशिवाय मुलामुलींची लग्ने न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे अनुकरण आवश्यक आहे.


‘लोकमत सखी मंच’ आणि अथर्व वधूवर सूचक केंद्रातर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘जोडीदार निवडताना’ या कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध विवाह समुपदेशिका प्रियदर्शनी हिंगे.

Web Title: Set priorities for expectations before marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.