वारणेत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारावे
By Admin | Updated: October 16, 2015 00:48 IST2015-10-15T23:31:25+5:302015-10-16T00:48:29+5:30
देवानंद शिंदे यांचे आवाहन : विनय कोरे गौरव प्रतिष्ठानच्या शिक्षक शिक्षण भूषण पुरस्काराचे वितरण

वारणेत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारावे
वारणानगर : वारणेकडे एक प्रचंड इच्छाशक्ती, दृष्टी व संस्कार आहेत. गुणवत्तेच्या जोरावरच प्रगतीचे अनेक टप्पे यशस्वीपणे गाठले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देशाला अभिप्रेत राहील, असे ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र’ वारणेने उभे करावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी येथे केले.येथील तात्यासाहेब कोरे पब्लिक चॅरिटेबल संचलित विनय कोरे गौरव प्रतिष्ठानच्यावतीने २०१५ गौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणेम्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी वारणा समूहाचे प्रमुख विनय कोरे होते. तात्यासाहेब कोरे विद्यानगरीतील वारणा शिक्षण संकुलात हा गौरव सोहळा पार पडला.
यावेळी दहा शिक्षकांना विनय कोरे शिक्षण भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. गौरव प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह जी. डी. पाटील यांनी स्वागत केले. विनय कोरे म्हणाले, वारणेने शिक्षणक्षेत्रात नेहमीच बाजी मारली आहे. आज शिक्षणक्षेत्रात अनेक शिक्षक चांगले काम करतात; परंतु ते पुरस्कारांपासून वंचित राहतात. अशा वंचित गुणीजनांचा वारणेने गौरव केला आहे.
यावेळी पद्मश्री तासगावकर, संभाजी लोहार, हरिश्चंद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते विनय कोरे शिक्षण भूषण पुरस्कार देण्यात आला. तर जी. डी. पाटील, सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील, वारणा महिला पतसंस्थेच्या संचालिका शुभलक्ष्मी कोरे, उपाध्यक्षा मंगला पाटील यांच्या हस्ते ‘गुणवंत विद्यार्थी’ पुरस्कार देण्यात आला. तसेच एमपीएससी परीक्षेत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. डी. के. गायकवाड, प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, प्राचार्या डॉ. सुरेखा शहापुरे, प्राचार्य जॉन डिसोझा, प्राचार्या हेलिना मोनीस आदी उपस्थित होते. प्रा. राजेंद्र कापरे यांनी आभार मानले. प्रा. प्रीती शिंदे व प्रा. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
पुरस्कार विजेते
प्रकाश ठाणेकर (पोर्ले तर्फ ठाणे), संजय बजारे (घोटवडे), चंद्रकांत निकाडे (पोहाळे), संभाजी लोहार (माळेवाडी), सुशीला खोत (वालूर), हरिश्चंद्र पाटील (गजापूर), सुभाष गुरव (नरंदे), भीमराव माडगुंडे (किणी), प्रभावती पाटील (कुरळप), जगन्नाथ शेटे (ऐतवडे खुर्द) यांच्यासह गुणवंत विद्यार्थी तसेच एमपीएससीतील यशस्वी विद्यार्थी अशा पन्नासपेक्षा जास्त गुणीजनांना पुरस्काराने गौरविण्यात आले.