समितीची अबू्र चव्हाट्यावर काढणाऱ्यांना घरी बसवा
By Admin | Updated: July 9, 2015 00:50 IST2015-07-09T00:50:27+5:302015-07-09T00:50:27+5:30
चंद्रदीप नरके : पंधरा वर्षांत शौचालय बांधू न शकणाऱ्यांची नैतिकता काय?

समितीची अबू्र चव्हाट्यावर काढणाऱ्यांना घरी बसवा
राजाराम लोंढे - कोल्हापूर -पंधरा वर्षे सत्ता उपभोगूनही बाजार समितीमध्ये ज्यांना शौचालये बांधता आली नाहीत, तीच मंडळी पुन्हा पैशाच्या जोरावर सत्तेची स्वप्ने बघत आहेत. भ्रष्टाचाराने समितीची अबू्र चव्हाट्यावर काढणाऱ्यांना घरी बसवा, असे आवाहन ‘शिव-शाहू परिवर्तन’ पॅनेलचे नेते आमदार चंद्रदीप नरके यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. भ्रष्टाचारी कारभाराची कबुली द्यायची आणि माफ करा म्हणणाऱ्यांना मते मागण्याची नैतिकता नसल्याचा टोलाही त्यांनी दोन्ही कॉँग्रेस आघाडीला हाणला.
कॉँग्रेस व त्यानंतर दहा वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनसुराज्य आघाडीची सत्ता बाजार समितीवर होती; पण दुर्दैवाने समितीमध्ये पायाभूत सुविधाही या मंडळींनी केल्या नाहीत. सत्तेच्या राजकारणात दोघांनी एकमेकांना सहकार्य करायचे आणि विरोधात गेले की आम्हाला फसविले म्हणून सांगण्याचा उद्योग या मंडळींनी केला; पण खऱ्या अर्थाने दोन्ही कॉँग्रेसनेच समितीच्या शेतकरी, व्यापारी व अडत्यांना फसविल्याचा आरोप आमदार नरके यांनी केला. कॉँग्रेसची सत्ता असताना विक्रमनगर येथील २३ एकर जमीन विकली. शाहू सांस्कृतिक मंदिर भाडेतत्त्वावर देताना कोणी हात मारला? या सर्व गोष्टींतील घोटाळा राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडी सत्तेवर आल्यावर उघड केला.
त्यांचा घोटाळा कमी पडला की काय म्हणून राष्ट्रवादीच्या मंडळींनी बाजार समितीतील एकही बोळ शिल्लक ठेवला नाही. जमेल तसा घोटाळा करण्याचा उद्योग या दोन्ही कॉँग्रेसच्या मंडळींनी केला आहे.
चुकीचा कारभार केला म्हणून तत्कालीन संचालकांना वगळल्याचे सांगत एकप्रकारे ही मंडळी भ्रष्टाचाराची कबुलीच देत आहेत. संस्थात्मक संख्येच्या ताकदीवर मतदारांना गृहीत धरायचे आणि राजकारणात पाहिजे तसे वाकविण्याचे काम दोन्ही कॉँग्रेसने केले आहे.
दोघांचा कारभार संबंधित घटकाने जवळून बघितला आहे. त्यामुळे अशी प्रवृत्ती समितीत पुन्हा घुसू देऊ नका, असे आवाहन करीत बाजार समिती नावारूपास आणण्यासाठी आगामी पाच वर्षांत ‘१२ कलमी जाहीरनामा’ घेऊन आम्ही मतदारांसमोर जात असल्याचेही आमदार नरके यांनी सांगितले.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसाठी तिरंगी लढत होत असून, रविवारी मतदान होत आहे. तिन्ही पॅनेलची भूमिका काय, कोणता जाहीरनामा घेऊन ते मतदारांसमोर जात आहेत, याबाबत पॅनेलप्रमुखांशी केलेला संवाद आजपासून...
सत्ता द्या, हे करतो...!
बाजार समितीमध्ये पायाभूत सुविधा देणार
शेतकऱ्यांची सोय व्हावी व समितीच्या उत्पन्नवाढीसाठी टेंबलाईवाडी, कागल, मलकापूर येथे उपबाजार सुरू करणार
कोल्हापुरी गुळाला ‘एक्स्पोर्ट झोन’ची मान्यता मिळवून देणार
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बसून आॅनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना भाजीपाला, गूळ, फळांचे दर समजतील, अशी व्यवस्था करणार.
ामितीत शेतकऱ्यांना निवासाची व अल्प दरात भोजनाची व्यवस्था
गुळाला किमान हमीभाव देण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न
गुऱ्हाळघरे अद्ययावत करून निर्यातक्षम गूळनिर्मितीला प्रोत्साहन देणार
शेतकरी-अडते-व्यापारी यांच्यातील वाद टाळण्यासाठी ‘आदर्श आचार संहिता’ तयार करणार
कळे (ता. पन्हाळा) येथे बांबूचा उपबाजार सुरू करणार
दर महिन्याला कार्यक्षेत्रातील विकास संस्था, ग्रामपंचायतीचे सदस्य, व्यापारी, अडते, हमाल-तोलाईदार यांची बैठक घेऊन समस्या निराकरण करणार
वारेमाप खर्चावर नियंत्रण ठेवून प्रशासनावर अंकुश ठेवू.