‘एनएसएस’ने केली लाखमोलाची सेवा
By Admin | Updated: November 10, 2014 00:42 IST2014-11-10T00:07:40+5:302014-11-10T00:42:38+5:30
शिवाजी विद्यापीठ : पाच वर्षांत तब्बल १८ कोटींची कामे

‘एनएसएस’ने केली लाखमोलाची सेवा
संतोष मिठारी -कोल्हापूर -महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचा व्यक्तिमत्त्व विकास साधण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेने (एनएसएस) शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात प्रबोधनासह पायाभूत सुविधांमध्ये लाखमोलाची कामे करून ग्रामीण भागाच्या विकासाला हातभार लावला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत ‘एनएसएस’द्वारे गेल्या पाच वर्षांत १८ कोटी रुपयांची कामे केली आहेत.स्वच्छता, एचआयडी-एड्सबाबत प्रबोधन, मानवाधिकार, ग्राहकांचे हक्क असे विविध विषय घेऊन ‘एनएसएस’ शहरासह ग्रामीण भागात पोहोचली. शासनाला विविध योजना राबविण्यासाठी आवश्यक असणारे सर्व्हेदेखील ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांनी केले; शिवाय श्रमदान संस्कार शिबिरे घेतली. त्याच्या आधारे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील ग्रामीण भागांत २००९-१० ते २०१३-१४ या पाच वर्षांत एकूण १७ कोटी ८५ लाख ९६ हजार ५७९ रुपयांची कामे केली आहेत. त्यात डोंगर, घाटमाथ्यावर १ लाख १६१ समतोल चरी आणि ६४२ बंधाऱ्यांच्या माध्यमातून जलसंवर्धनाचे काम देखील आहे. चिखलांनी माखलेल्या पाणंदीमधील २ लाख ६८ हजार ५०० मीटरचे सुमारे १३ कोटी ४२ लाख ७२ हजार ५०० रुपयांचे रस्ते साकारले आहेत.७ हजार १६५ शौचखड्डे तयार करून स्वच्छतेचा संदेश देत रोगराईला आळा घालण्याचे काम केले; शिवाय ५ लाख ७७ वृक्षांचे रोपण आणि १४ लाख १३ हजार बीजरोपणाचे काम करून पर्यावरण संवर्धनाला मदत केली आहे. विविध महाविद्यालयांमध्ये जयंती, उत्सवाचे निमित्त साधत शिबिरांद्वारे २७ हजार १७६ रक्तपिशव्यांचे संकलन करून रक्तदान चळवळीला बळ दिले आहे. निव्वळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर अशा पद्धतीने ग्रामीण विकासाला हातभार लावून महात्मा गांधीजींनी दिलेल्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाला मूर्त स्वरूप देण्याचे प्रशंसनीय काम केले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतून देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील परिस्थितीचे ज्ञान मिळते एवढे निश्चित!
देशात पावणेचार कोटी स्वयंसेवक
युवा व खेळ प्राधिकरणाने १९६९ मध्ये महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात केली. सुरुवातीला देशांतील ३७ विद्यापीठांमधील ४० हजार विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते. आज देशात ३ कोटी ७५ लाखांहून अधिक ‘एनएसएस’चे स्वयंसेवक कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठातील अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विद्यापीठ संलग्नित १७२ महाविद्यालयांत २३ हजार स्वयंसेवक आहेत.
वृक्षसंवर्धन, जलसंधारणाचे काम वाढविणार
प्रबोधनासह विद्यापीठ कार्यक्षेत्रात जी कामे झाली, ती विशेष श्रमसंस्कार शिबिर आणि प्रत्येक महाविद्यालयाला दोन वर्षे एक गाव दत्तक देऊन केली आहेत. त्याचा चांगला परिणाम झाला. यापुढे ‘एनएसएस’द्वारे विद्यापीठ वृक्षसंवर्धन, जलसंधारणाचे काम अधिक व्यापक करणार आहे.
- डॉ. डी. के. गायकवाड, संचालक, शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ